हिंगोलीतल्या दसऱ्यात गाजली 'महिमाची दंगल'!

गेल्या वर्षी आमिर खानचा दंगल सिनेमा सुपरहिट ठरला... त्यानंतर महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला... पण त्याहीआधी गेली कित्येक वर्षं यवतमाळमधल्या महिमाची दंगल सुरू होती... महिला कुस्तीपटू म्हणून बरीच अवहेलनाही वाट्याला आली... पण तिनं निर्धार सोडला नाही.

Updated: Oct 4, 2017, 10:54 PM IST
हिंगोलीतल्या दसऱ्यात गाजली 'महिमाची दंगल'! title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : गेल्या वर्षी आमिर खानचा दंगल सिनेमा सुपरहिट ठरला... त्यानंतर महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला... पण त्याहीआधी गेली कित्येक वर्षं यवतमाळमधल्या महिमाची दंगल सुरू होती... महिला कुस्तीपटू म्हणून बरीच अवहेलनाही वाट्याला आली... पण तिनं निर्धार सोडला नाही.

यवतमाळमधल्या पुसद तालुक्यातल्या दुधगिरी तांड्यातली ही महिमा राठोड.... गेली अनेक वर्षं परिस्थितीशी झगडत तिची दंगल सुरू आहे... महिमा सध्या स्कूल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे १७ वर्ष वयोगटातल्या ४३ किलो वजन गटात राज्य स्तरावर खेळते. तिनं आतापर्यंत दोन गोल्ड आणि दोन कांस्यपदकं मिळवलीत. कुस्तीमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचं वडिलांचं स्वप्न महिमाला पूर्ण करायचंय. त्यासाठीच गेल्या नऊ वर्षांपासून तिची तालीम सुरू आहे. तिनं अनेक मुलांना कुस्तीच्या आखाड्यात धूळ चारलीय. खेडोपाडी जिथे जिथे कुस्तीची स्पर्धा असेल, त्यात भाग घेऊन ती मुलांना नामोहरम करते. यावेळचा हिंगोलीतला दसराही तिच्या दंगलीमुळंच गाजला.  
 
महिमा जिथे राहते, त्या यवतमाळमधल्या छोट्याशा दुधगिरी तांड्यावर कुस्तीसाठी कुठलंही पोषक वातावरण नाही. दुधगिरी ते फुलवाडी असं रोज ती दहा किलोमीटर धावते. तिचे पणजोबा, आजोबा, वडील आणि काकाही पहलवान आहेत. त्यांचाच वारसा ती पुढे चालवतेय. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यानं तिच्या वडिलांना आखाडा सोडावा लागला. पण सुवर्णपदक जिंकायचं स्वप्न आता त्यांची मुलगी पूर्ण करेल, असा विश्वास राजू राठोड यांना आहे.  

महिमाची आई रोज मजुरी करते, वडीलही रोज मजुरी करून शेतीचा तुकडा सांभाळतात. महिमा बरोबरच तिचा लहान भाऊ यशही कुस्त्या खेळतो. यशला ही महाराष्ट्र केसरी व्हायचंय. या दोघांच्या आहारासाठी महिन्याला २० हजार रुपयाचा खर्च येतो... तो भागवण्यासाठी महिमा गावोगावी कुस्त्या खेळते... त्यातून मिळणाऱ्या बक्षीसातून दोघांच्या महिन्याच्या खुराकाचा खर्च भागतो... पैसे मिळाले नाहीत, तरी तालीम मात्र नियमित सुरू असते. 
 
आमिर खानचा दंगल गेल्या वर्षी प्रदर्शित झाला... पण त्याआधी नऊ वर्षांपासून महिमाची ही दंगल सुरू आहे... आमिरचा दंगल आला हे बरंच झालं... त्यामुळे तरी लोकांच्या विचारसरणीत थोडा फरक पडल्याचं महिमा सांगते...

मुलांबरोबर मुलगी कुस्ती खेळते म्हणून कित्येक वेळा समाजानं टीका केली... पण महिमाला पहलवान बनवायचंच, हा तिच्या वडिलांचा निर्धार काही ढळला नाही. महिमाला देशासाठी सुवर्णपदक जिंकायचंय... त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेतेय... तिच्या या मेहनतीबरोबरच महिमाला बळ देण्याची गरज आहे.