माळशेज घाट तीन दिवस वाहतुकीसाठी बंद

दरड कोसळल्यामुळे माळशेज घाट बंद करण्यात आलाय. येथील दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 

Updated: Aug 21, 2018, 06:10 PM IST
माळशेज घाट तीन दिवस वाहतुकीसाठी बंद title=

ठाणे : दरड कोसळल्यामुळे माळशेज घाट बंद करण्यात आलाय. येथील दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, पावसाचा जोर  आणि पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असल्याने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे मुंबई अहमदनगरचा थेट संपर्क तुटला आहे. दरड कोसळून एक जण जखमी झालाय. तर पुढचे तीन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.

दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. महामार्ग अधिकारी  कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले दरड हटविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, दरड कोसळून मार्गावर साचलेले दगड, माती हटवून मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.