वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी करणाऱ्या निकीता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू निकीता काळेला सुवर्णपदक मिळालं.

Updated: Sep 13, 2017, 06:01 PM IST
वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी करणाऱ्या निकीता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत

मनमाड : नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू निकीता काळेला सुवर्णपदक मिळालं. या गोल्डन कामगिरीनंतर निकीताचं मनमाडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. तिच्या स्वागतासाठी मनमाडकर मनमाड बसस्थानकावर थांबले होते. तिचं आगमन होताच सुवासिनींनी तिचं औक्षण केलं. त्यानंतर ढोल- ताश्यांच्या  गजरात शहरात तिची मिरवणूक काढण्यात आली.  

निकिता ज्या शाळेत शिकली त्या छत्रे न्यू  इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करत निकीताचं स्वागत केलं. तर ज्या जयभवानी व्यायाम शाळेत निकिताने  वेटलिफ्टिंगचे  प्राथमिक धड़े घेतले तिथेही तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्वागतानं निकीता भारावून गेली. ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार तिनं केलाय.

निकिता काळेचा  वेटलिफ्टिंग खेळातला प्रवास थक्क करणारा आहे. निकिताने कॉमन वेल्थ स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत ७३ किलो स्नॅच आणि ९० किलो क्लीन जर्क असे १६३ किलो  वजन  उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली. लाडक्या लेकीच्या या कामगिरीमुळे तिचे आईवडीलही खूष आहेत.

निकिता काळेच्या जडणघडणीत तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आणि मनमाडच्या जयभवानी व्यायाम शाळेचा मोठा वाटा आहे. व्यवहारे सरांनी निकिताला वेटलिफ्टिंग धडे दिले. सातत्याने सराव करवून घेतला. त्यामुळे निकिताने आज आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक मारली आहे .

गेल्या २० वर्षांपासून मनमाडसारख्या ग्रामीण भागातून वेटलिफ्टिंगपटू घडविण्याचे काम करणाऱ्या प्रवीण व्यवहारे यांच्या मेहनतीचे निकितानं चीज करून दाखविलं. आता निकिताकडून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निकिताच्या प्रयत्नाला भारताचं क्रीडा धोरण आणि मदतीची साथ मिळालली तर आगामी ऑलम्पिक स्पर्धेत निकिता भारताला नक्की सुवर्णपदक मिळवून देईल. 

 

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close