या सरकारच्या काळात देव सुखी, मात्र माणसे नाही - राजू शेट्टी

देवधर्मासाठी सरकारकडे निधी आहे, परंतु, माणसांसाठी नाही, शासनाच्या तिजोरीतील ४० हजार कोटी रुपये या सरकारने देवधर्मासाठी खर्च केले. या सरकारच्या काळात देव सुखी आहे पण माणसे नाहीत, असा घणाघाती हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय.

Updated: Sep 27, 2017, 07:57 AM IST
या सरकारच्या काळात देव सुखी, मात्र माणसे नाही - राजू शेट्टी title=

जळगाव : देवधर्मासाठी सरकारकडे निधी आहे, परंतु, माणसांसाठी नाही, शासनाच्या तिजोरीतील ४० हजार कोटी रुपये या सरकारने देवधर्मासाठी खर्च केले. या सरकारच्या काळात देव सुखी आहे पण माणसे नाहीत, असा घणाघाती हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय.

थोड्याशा पैशांसाठी राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, शेतकरी पेटून उठला तर तुमचं काही खरं नाही हे ध्यानात ठेवा असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. जळगावात झालेल्या राज्यस्तरिय शेतकरी कर्जमुक्ती तसच हमीभाव परिषदेला राजू शेट्टी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

काल मंत्रालयात शेतकरी कर्जमाफीबाबत पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. यामुळे ही शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया आता दिवाळीपर्यत पुढे ढकलली गेली असून कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्या आधी शेतक-यांचे तोंड गोड करू, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिलेय.