नागपुरातले नीरव मोदी, देना बँकेची कोट्यवधींची फसवणूक

बँकेतून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता दुसऱ्याच कामात तो पैसा वापरणाऱ्या नीरव मोदीप्रमाणे लोक नागपुरातही असल्याचं समोर आलंय. 

Updated: Jun 19, 2018, 10:39 PM IST

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : बँकेतून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता दुसऱ्याच कामात तो पैसा वापरणाऱ्या नीरव मोदीप्रमाणे लोक नागपुरातही असल्याचं समोर आलंय. नागपुरात दोन वेगवेगळ्या प्रकरणात काही महाभागांनी देना बँकेला सुमारे साडेपाच कोटींना फसवल्याचं उघड झालंय. देना बँकेच्या फसवणुकीचा हा आकडा 90 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. देना बँकेच्या नागपुरातल्या विविध शाखांमध्ये कोट्वधींच्या बोगस कर्ज प्रकरणाचां गैरव्यवहार उघड झालाय. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या संदर्भात दोन गुन्हे नोंदवले आहेत.

यातले पहिले प्रकरण सतीश वाघ आणि त्यांच्या 9 सहकाऱ्यांचं आहे. या सर्वांनी नागपूरच्या दवलामेटी परिसरात मोठा प्लॉट घेऊन त्यावर स्वतंत्र घर बांधण्यासाठी 2015 मध्ये देना बँकेच्या सिव्हील लाईन्स शाखेतून 3 कोटी 45 लाखांचं कर्ज घेतलं. मात्र अनेकवर्ष या ठिकाणी कोणतंही बांधकाम झालं नाही. मात्र पैसा दुसरीकडे वापरण्यात आला. काही वर्षांनी कर्जाची परतफेडही थांबवली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता प्लॉट अवघा 27 लाखांचा असल्याचं उघड झालं. सतीश वाघने बँकेच्या तत्कालिन अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचं उघड झालंय.

दुसरे प्रकरण देना बँकेच्या धरमपेठ शाखेतलं आहे. दिलीप कलेले आणि समीर चट्टे नावाच्या व्यक्तीने प्लास्टीकचं टेबल खुर्चा बनवण्याचा व्यवसाय असल्याचं कागदोपत्री दाखवत व्यवसाय वाढीसाठी 2 कोटी रूपयांची क्रेडीट मिळवली. मात्र या दोघांनी रक्कम व्यवसाय वाढीसाठी न वापरता त्यांच्या काही नातेवाईकांच्या खात्यात वळवली. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत कलेले आणि चट्टे यांचे कोणतेही व्यवसाय नसल्याचं उघड झालंय.

आणखी 19 व्यापारी आणि कंपन्यांची कर्ज संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सध्या बँक अधिकारी आणि पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. बँकेचे एकूण 90 कोटी यात अडकलेत. या प्रकरणात देना बँकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगलंय.