... आणि नागपूरमध्ये वकिलानेच न्यायाधीशांच्या कानशिलात लगावली

सहायक सरकारी वकील डी. एम. पराते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Dec 26, 2018, 06:16 PM IST
... आणि नागपूरमध्ये वकिलानेच न्यायाधीशांच्या कानशिलात लगावली title=

नागपूर - नागपूरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एका सरकारी वकिलाने थेट सत्र न्यायाधीशांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक अवाक् झाले. न्यायालयाच्या इमारतीत सातव्या मजल्यावर लिफ्टच्या बाहेर बुधवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. आर. देशपांडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक सरकारी वकील डी. एम. पराते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर त्यांना कानशिलात लगावली.

एका प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून सरकारी वकील पराते नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी न्यायाधीशांच्या कानशिलात लगावली, अशी माहिती मिळते आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात वरिष्ठ सरकारी वकील नितीन तेलगोटे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. जर आरोपीची कोणतीही तक्रार होती, तर त्याने योग्य पद्धतीने तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता. समाजात वकिलांकडे आदराने बघितले जाते. त्यामुळे वकिलांनी याची काळजी घेतली पाहिजे.