नाणार प्रकल्प विरोध : कॉंग्रेसचे शिष्‍टमंडळ नाणारवासियांच्‍या भेटीसाठी रवाना

राजापूरातील नाणार परिसरातील प्रस्‍तावित रिफायनरी प्रकल्‍पाला स्‍थानिकांचा होणारा विरोध..

Updated: Apr 19, 2018, 11:52 AM IST
नाणार प्रकल्प विरोध : कॉंग्रेसचे शिष्‍टमंडळ नाणारवासियांच्‍या भेटीसाठी रवाना   title=

अलिबाग : राजापूरातील नाणार परिसरातील प्रस्‍तावित रिफायनरी प्रकल्‍पाला स्‍थानिकांचा होणारा विरोध लक्षात घेवून त्‍यांची भूमिका समजून घेण्‍यासाठी कॉंग्रेसचे शिष्‍टमंडळ नाणारकडे रवाना झाले आहे . बुधवार आणि  गुरुवार असे दोन दिवस हे शिष्‍टमंडळ येथील शेतकऱ्यांच्‍या भावना समजून घेतील. दरम्यान, शिवसेनेने या प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय. तसेच राज ठाकरे यांच्या मनसेनेने विरोध करताना मुंबईतील प्रकल्पाचे कार्यालय  फोडले. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन होण्याचे संकेत मनसेकडून देण्यात आलेत.

 काँग्रेसने आता नाणार प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा भावना जाणून घेण्यासाठी भर दिलाय. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून हा विनाशकारी प्रकल्प बागायती क्षेत्रामध्ये कशासाठी असा सवाल देखील कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.

स्थानिकांचा याला विरोध असताना हा प्रकल्प लादला जात आहे यामुळे कोकणचे अस्तित्व संकटात येऊ शकते याबाबत प्रकल्पग्रस्तांचे नेमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याकरिता जात असल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. या शिष्‍टमंडळात कॉंग्रेसचे हुसेन दलवाई , भाई जगताप , माजी आमदार माणिक जगताप , जनरल सेक्रेटरी  राजन भोसले , हुस्‍नबानू खलिपे यांच्‍यासह १५ ते २० जणांचा  समावेश आहे.