नांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं?

सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे? 

Updated: Oct 12, 2017, 07:12 PM IST
नांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं? title=

मुंबई : सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे? 

आज नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक दिवसांनी काँग्रेसला हे निर्विवाद यश पहायला मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला नसता तरच नवल... नांदेडमध्ये मिळालेलं घवघवीत यश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं कर्तृत्व आणि कष्टाचं फळ मानायला हवं. एव्हढचं नाही तर या निकालानं राज्यातल्या काँग्रेसला बळ देण्याचं काम प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी केलं.

काँग्रेसला काय मिळालं?

1. नांदेडमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

2. अनेक शहरी समस्या असतानाही नांदेडकरांनी अशोक चव्हाणांच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे अशोक चव्हाणांचं स्थान भक्कम झालं

3. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचा एकत्रित विरोध मोडून अशोक चव्हाणांनी नांदेडवरचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं

4. निवडणुकीच्या काळात मतभेद विसरुन एकत्र काम आणि परिश्रमानं विजय मिळवता येतो, हे दाखवून दिलं

5. राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम या विजयानं केलंय

6. राणेंसारख्या टीकाकार नेत्यांना चव्हाणांनी आपल्या कामगिरीतून उत्तर दिलं

दुसरीकडे  ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या भाजपच्या पदरात मात्र पुरती निराशाच पडलीय.

भाजपचं काय नुकसान ?

1. आयात नेते आणि उमेदवार यांच्या माध्यमातून विजय मिळवता येत नाही, हा धडा भाजपला मिळाला

2. प्रताप पाटील चिखलीकर या शिवसेना आमदाराला नेतृत्वाची दिलेली धुरा भाजपला चांगलीच महागात पडली

3. मुख्यमंत्र्यांची मोठी सभा होवूनही आणि अनेक मंत्र्यांनी ठाण मांडूनही त्याचा लाभ भाजपला उठविता आला नाही

4. पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न या मु्द्दयावर अधिक संवेदनशील व्हायला हवे, हा धडा भाजपला मिळाला

5. मोदी सरकारच्या विरोधात जनतेत आणि सोशल मीडियावर असलेला रोष नांदेडच्या मतपेट्यांतून पहायला मिळाला

4. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी मदत केल्यानं मित्रपक्षाचं काय करायचं याचा निर्णय करावा लागणार आहे

तर नांदेडमध्ये क्रमांक दोनवर असलेल्या शिवसेनेलाही या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. मात्र, काँग्रेसला मदत करत भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात शिवसेनेला यश आलं. मात्र नांदेड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या मात्र यामुळं रोडावली आहे. प्रताप पाटील चिखलीकरांसारख्या बंडखोरांवर आता तरी कारवाई होणार का? हा प्रश्न आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचं या निवडणुकीतलं अस्तित्व असून नसल्यासारखंच होतं आणि राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा अशोक चव्हाणांचा निर्णय योग्यच होता, हेही या निवडणुकीनं दाखवून दिलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राज्यात ज्या एमआयएम फॅक्टरचा उदय ज्या नांदेडमधून झाला होता, त्याच महापालिकेत त्याच मतदारांनी एमआयएमला पूर्णपणे नाकारत, मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठिशी असल्याचा संदेश दिलाय. आता हा विजयाचा ट्रेण्ड राज्यात इतरत्र आणि देशपातळीवर दिसणार का, भाजप यातून धडा घेवून काही पावलं उचणार का, हे येत्या काळात पहावं लागेल.