आर्टीलरी स्कूल : जेव्हा तोफेची गर्जना होते, तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो

 जगातल्या चौथ्या क्रमांच्या आर्मीचा तोफखाना आग ओकतो म्हणजे नेमकं काय होतं? केवळ चुणूक दाखवणारा युद्धसरावही चांगलाच हादरा निर्माण करणारा असतो. ऊर अभिमानाने भरून टाकणाऱ्या या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.

Updated: Jan 16, 2018, 10:25 PM IST
आर्टीलरी स्कूल : जेव्हा तोफेची गर्जना होते, तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो

योगेश खरे, नाशिक : देशातलं महत्त्वाचं तीर्थस्थळ नाशिक आहेच, पण लष्कराच्या नकाशावरही नाशिकचं स्थान अति महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे इथे असलेले आर्टीलरी स्कूल.  म्हणजेच तोफखाना विभागाचं महत्त्वाचं केंद्र. 'आर्मी डे'च्या दुसऱ्या दिवशी झालेल्या तोफची हा कार्यक्रम म्हणजे तोफखाना विभागाच्या सज्जतेची केवळ एक चुणूक. मात्र केवळ चुणूक दाखवणारा युद्धसरावही चांगलाच हादरा निर्माण करणारा असतो. ऊर अभिमानाने भरून टाकणाऱ्या या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.

 तोफांची सज्जता, सैनिकांचं प्रशिक्षण

भारताच्या सीमांचं इंडियन आर्मी रक्षण करते. पण पाकिस्तानसारखे खोडसाळ शत्रू जेव्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमावर्ती भागात त्रास देतात तेव्हा त्यांच्यावर भडीमार करून त्यांना धडा शिकवण्याचं काम आर्मीचा तोफखाना विभाग करतो. या तोफखाना विभागाचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं देवळाली इथलं आर्टीलरी स्कूल. तोफखान्यातल्या विविध तोफांची सज्जता, सैनिकांचं त्यासंबंधीचं प्रशिक्षण, सराव इथे देवळालीत चालतो.

 सैनिकाचं काम शिस्तबद्ध 

युद्धभूमीवर तोफा एका विशिष्ट पद्धतीने मांडल्या जातात त्यासाठी फायरींग प्लॅटफॉर्म आखला जातो. लष्कराची प्रत्येक हालचाल म्हणजे अगदी प्लॅटफॉर्म तयार करण्यापासून ते तोफ प्रत्यक्ष मारा करेपर्यंतची प्रत्येक कृती ही शिस्तबद्ध असते. त्यासाठीचं ड्रील जाणीवपूर्वक तयार केलेलं असतं. नेमलेला प्रत्येक सैनिक हा त्याचं काम शिस्तबद्धरित्या चोख बजावत असतो. 

उखळी तोफांच्या जोडणीनंतर समोर येतात त्या लांब पल्ल्याच्या मोठा तोफा. 155 मिमी बोफोर्स, 105 मिमी इंडियन फिल्ड गन, 105 मिमी लाईट फिल्ड गन फायरींग प्लॅटफॉर्मवर येऊन असेंबल केल्या जातात. असेंब्ली झाल्यावर त्यांची मारक क्षमता दाखवण्यासाठी त्यांचं रेंजवर फायरींग केलं जातं. 

आदेशाची काटेकोर अंमलबजावणी

मिळालेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करत प्रत्येक तोफ शिस्तबद्धरित्या चोख फायरींग करते. शत्रूचा प्रदेश कसा भाजून काढायचा याचं हे प्रात्यक्षिक असतं. बोफोर्स तोफांचं फायरिंग, बोफोर्सची 360 अंशांत मारा करण्याची क्षमता, एकाचवेळी 40 रॉकेट्सचा मारा करण्याची क्षमता असलेलं 122 मिमी मल्टी बॅरल लाँचरचं फायरींग भारताच्या सामर्थ्याची कल्पना देतं. पण संपूर्ण शहर उध्वस्त करणारं ब्राम्होस क्षेपणास्त्राचं फायरींग धडकी भरवतं. 

तोफगोळ्यांची लक्ष्यभेद

तोफखाना म्हणजे केवळ तोफांचा मारा नाही. तर डागलेले तोफगोळे योग्यप्रकारे लक्ष्यभेद करत आहेत की नाही हेही पाहणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी ऑब्जर्वेशन पोस्ट प्रत्यक्ष लक्ष्याच्या जवळ निर्माण केली जाते. तिथे म्हणजे शत्रूच्या अगदी जवळ जाण्याचं काम स्वतः सैनिक करतात. त्यासाठी त्यांना मदत होते ती आर्मी एव्हीएशनची.

पॅराशूटच्या सहाय्याने सैनिकांची लँड 

म्हणजे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सैनिक पोस्टवर नेले जातात. गरजेनुसार कधी हेलिकॉप्टरमधून तर कधी थेट पॅराशूटच्या सहाय्याने सैनिक पोस्टवर अचूक लँड होतात. भारताच्या सीमांचं केवळ रक्षण नाही तर वेळप्रसंगी शत्रूच्या सीमा भाजून काढण्याचं काम आपला तोफखाना करत असतो. जगातल्या चौथ्या क्रमांच्या आर्मीचा तोफखाना आग ओकतो म्हणजे नेमकं काय करतो याची ही केवळ एक चुणूक.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close