संभाजी भिडे चौकशीत दोषी

 दोन वेळेस नोटीस देऊनही भिडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा करणं टाळलं होतं

Updated: Jul 10, 2018, 09:17 AM IST
संभाजी भिडे चौकशीत दोषी title=

नाशिक : 'शिवप्रतिष्ठान' या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे नाशिक महापालिकेच्या रडारवर आलेत. 'आंबा खाऊन संतती' होण्याच्या वक्तव्यावर नाशिक पालिकेच्या चौकशीत दोषी आढळलेत. 'प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती' पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत सदस्यांच्या चित्रफीत चौकशी अहवालात संभाजी भिडे दोषी आढळलेत. उल्लेखनीय म्हणजे, चौकशी दरम्यान महापालिकेनं संभाजी भिडे यांना दोन वेळेस नोटीस देऊनही भिडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा करणं टाळलं होतं. नाशिक महापालिकेच्या आरोग्य समितीच्या १३ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.  

'आंबा खाऊन पुत्रप्राप्ती'

आंबा खाऊन मूल होतं, असा अजब शोध संभाजी भिडे यांनी लावला होता. दरम्यान, संभाजी भिडे हे केवळ एक विधान करून थांबले नाहीत. तर त्यांनी आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्ती करुन दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिक येथील मेळाव्यात ते बोलत होते. मूल होत नसेल तर आंबा खाऊन मूल होते. इतकेच नाही तर केवळ मुलगाच हवा असेल तर तेही शक्य करून दाखविले आहे. तसेच, अनेक दाम्पत्याला मुलगा मिळवून दिला असल्याचा दावाही संभाजी भिडे यांनी नाशिकच्या मेळाव्यात केला होता. 

संभाजी भिडे यांचा हा दावा म्हणजे गर्भनिदान कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असल्याची तक्रार पुण्यातील आरोग्य विभागाकडे दाखल करण्यात आली होती. गणेश बोऱ्हाडे यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

राजकीय प्रतिक्रिया

दरम्यान, यानंतर 'आम्ही सदैव भिडे गुरुजींसोबत आहोतच' असं म्हणत शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून भिडेंना पाठिंबा दर्शवला होता तर संभाजी भिडे यांच्या उलट सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होतेय त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती.