अहमदनगरमध्ये तणाव, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक?

अहमदनगरमध्ये आमदारांच्या अटकेचं सत्र सुरुच राहण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात, अशी स्थिती आहे.

Updated: Apr 10, 2018, 08:15 AM IST
अहमदनगरमध्ये तणाव, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक? title=

अहमदनगर : आमदारांच्या अटकेचं सत्र सुरुच राहण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात, अशी स्थिती आहे. संग्राम जगतापांनंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक करण्यात आलेय. दुसरीकडे आरोपींना फाशी देण्याची पीडित ठुबे कुटुंबीयांनी मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेत. आजही नगरमध्ये तणाव दिसून येत आहे. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

 आमदार जगताप चौकशीसाठी ताब्यात?

अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या हिंसाचारात हत्याकांडानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डीले यांना अटक करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलंय.  अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून केडगावात दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. त्यानंतर मोठा हिंसाचार आणि तोडफोडीच्या घडना घडल्या होत्या. त्यामुळे नगरमध्ये अशांतता पसरली आहे. राजकीय तणाव आजही कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ केलेय. 

राज्य सरकारवर हल्लाबोल

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय.