राष्ट्रवादीचा 'पुण्या'वर दावा, मग काँग्रेसकडे 'बारामती'?

. या पार्श्वभूमीवर थेट बारामतीच्या जागेची मागणी करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला काटशह देण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Apr 13, 2018, 05:05 PM IST

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : २०१९ मध्ये पुण्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा असेल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभेच्या जागेवर दावा सांगितलाय. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातील संभाव्य राजकीय समीकरणं काय असतील? यावर आतापासूनच चर्चा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर थेट बारामतीच्या जागेची मागणी करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला काटशह देण्याचा प्रयत्न केलाय. 

हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय मनसुबा नाही तर तो त्यांचा दावा आहे. पुण्यातील हल्लाबोल सभेत स्वत: अजित पवारांनी ही घोषणा केलीय. या सभेला झालेली गर्दी बघून अजित पवारांना पुण्याच्या जागेची आस निर्माण होणं साहजिक आहे. इतकंच नाही तर गेल्या निवडणूकांमधील पराभवानंतर पुण्यामध्ये पक्षाची परिस्थिती सुधारल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. अशावेळी आघाडी होवो अथवा न होवो, पुण्यात राष्ट्रवादीचाच खासदार होणार असल्याचं सांगून त्यांनी मित्रपक्षाला थेटपणे डिवचलंय. पण यावर पुणे काँग्रेसनेही उलट चिमटा काढलाय. पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहणारच उलट बारामतीतही काँग्रेसची ताकद वाढल्याने त्या मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरची पहिली निवडणूक वगळता पुढील सर्व निवडणुका आघाडीतून लढल्या गेल्या. २००४, २००९ तसेच २०१४ ला पुण्याची उमेदवारी काँग्रेसकडे होती. या संपूर्ण काळात शहरातील म्हणजेच पुणे लोकसभा मतदार संघातील राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे. अर्थात संपूर्ण देशात हीच परिस्थिती आहे, असं असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची नांदी सुरु झालीय. गण गौळण आणि वग अजून बाकी आहे.