बुलेटराजा आणि बुलेटराण्यांनो सावधान, कारण...

वाहतुकीच्या बाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय 

Updated: Sep 12, 2018, 05:11 PM IST
बुलेटराजा आणि बुलेटराण्यांनो सावधान, कारण...

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान... शानदार सवारी असली तरी, आता फटाके फोडल्यासारखे आवाज करत गेलात, तर या बुलेट राजांविरोधात कारवाई होणार आहे. कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या अशा बुलेट विरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतलीय. बुलेट चालकाला किंवा मालकाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहेच. पण त्याचबरोबर गॅरेज मालकांवरदेखील कारवाई होणार आहे. कारण, बुलेटचा मूळ सायलेन्सरचा आवाज मोठा नसतो. त्यात, बदल करून असा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवले जातात. त्यामुळं बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेजवरही कारवाई होणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलीय. 

बुलेट राजा वाहतूक नियमांचे असे उल्लंघन करत असताना एकूण पुणेकरच वाहतुकीचे नियम पाळण्यात बेशिस्त असल्याची आकडेवारी पुन्हा समोर आलीय. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत तब्ब्ल 10 लाख लाख पुणेकरांनी वाहतुकीचे नियम मोडलेत. त्यांच्याकडून 22 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. 

यामध्ये, झेब्रा क्रॉसिंग पुढे थांबणाऱ्या 3 लाख 37 हजार 384 वाहन चालकांकडून 7 कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर, त्या पाठोपाठ हेल्मेट न घालणाऱ्या 37 हजार दुचाकी चालकांवर कारवाई करून 2 कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय. 

एकूणच वाहतुकीच्या बाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा पुणेकरांनी कायमच ठेवलाय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close