सचिन अंदुरेचे कुटुंबिय आणि मित्रांभोवतीही चौकशीचा फास

पहाटे 3 वाजता एटीएस आणि स्थानिक पोलिसांची कारवाई

Updated: Aug 21, 2018, 12:10 PM IST
सचिन अंदुरेचे कुटुंबिय आणि मित्रांभोवतीही चौकशीचा फास title=

औरंगाबाद : दाभोलकर हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी सचिन अंदुरेच्या कुटुंबियांभोवतीही आता चौकशीचा फास आवळायला सुरूवात झाली आहे. सचिन अंदुरेच्या चुलत भावाच्या आणि मित्राच्या घराची झडती घेतली आहे. औरंगाबाद देवळाई भागात एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी आज पहाटे तीन वाजता ही कारवाई केली.

शरद कळसकरनेही झाडली गोळी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेही गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सचिन अंदुरेबरोबरच कळसकरही प्रत्यक्ष मारेकरी असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. कळसकर सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहे. एटीएसच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 

कशा झाडल्या गोळ्या?

सीबीआयने शनिवारी अंदुरेला अटक केली आहे. 19 ऑगस्ट 2013 ला कळसकर आणि अंदुरे यांनी औरंगाबादहून पुण्यासाठी बस पकडली. 20 ऑगस्टला सकाळी दोघे शिवाजी नगरमध्ये पोहोचले. ओकांरेश्वर मंदिराजवळ त्यांनी बाईक घेतली. 6 वाजून 40 मिनिटांनी दोघेही बाईकवरुन ओकांरेश्वर पुलावर पोहोचले. दाभोलकर 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पुलावर पोहोचले. त्यांच्यावर कळसकरनं 2 तर अंदुरेनं एक गोळी झाडली.