'१० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही'

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

Updated: Jan 13, 2019, 09:15 PM IST
'१० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही' title=

नाशिक : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. १० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. फसवायला निघालेले स्वत:च फसलेले हे पहिले सरकार आहे. आरक्षणाचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरही निशाणा साधला. शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. नवरा-बायकोचं भांडण असतं तर घटस्फोट झाला असता. अमित शाह प्रियकर आणि उद्धव ठाकरे प्रेयसी आहे. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंचे नवे प्रियकर आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नोटबंदी ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा व्हावा, म्हणून केली असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. भटजी हा नेहमी मागत असतो, तो कधीच देत नाही. त्यामुळे हे सरकार दुष्काळात काहीच देणार नाही. अशा सरकारला बाहेर करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.