Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'

Pune Porsche Accident MLA Wife Post: पुण्यामध्ये दोन जणांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसंदर्भात आमदारच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. आमदार पत्नीची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2024, 08:18 AM IST
Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..' title=
आमदाराच्या पत्नीची पोस्ट चर्चेत

Pune Porsche Accident MLA Wife Post: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये पोलीस कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी मंगळवारी अपघात झाला त्यावेळेस गाडी चालवणाऱ्या मुलाच्या वडिलांना म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवालला बेड्या घातल्या. या प्रकरणामध्ये या अल्पवयीन मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांनाही ताब्यात घेतलं आहे. सदर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारपरिषद घेऊन कारवाईसंदर्भातील आदेश दिल्याची माहिती दिली. एकीकडे या प्रकरणामधील चौकशीला वेग आलेला असतानाच दुसरीकडे एका आमदाराच्या पत्नीने अपघातास कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या या आमदार पत्नीची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

कोण आहे हा आमदार?

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत या प्रकरणात कार अपघातासाठी दोषी असलेला मुलगा हा आपल्या मुलाच्या शाळेतच होता असं म्हटलं आहे. या मुलाच्या ग्रुपमधील काही मुलांनी प्राजक्त तनपुरेंच्या मुलालाही शाळेत असताना त्रास दिला होता, असा दावा सोनाली यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा त्रास एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की अखेर आम्ही मुलाची शाळा बदलली, असंही सोनाली तनपुरेंनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'ट्रक आणि ओला चालकांना का नाही..'; Pune Porsche Accident प्रकरणी राहुल गांधींचा रोखठोक सवाल

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे आमदार पत्नीने?

"कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या... संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही," असं सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे. तसेच पुढे सोनाली यांनी, "शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता," असंही म्हटलं आहे. "त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा," असं सोनाली तनपुरे यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई केली जाईलं असं म्हटलं आहे. पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात एकूण चार जणांना अटक केली आहे.