पुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी

अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.

Updated: Nov 24, 2017, 01:28 PM IST
पुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी title=

पुणे : अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.

डीएसकेंच्या पाठीराख्यांनी सपोर्ट डीएसके मोहीम सुरु केलीय. राज ठाकरे यांच्या याप्रकरणातील उडीने आता प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरेंची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्या ठेवीदारांच्या भेटीसाठी आले आहेत. बीएमसीसी रस्त्यावरील दरोडे सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आलीय. इथे राज ठाकरे काय भूमिका मांडतात याबद्दल उत्सुकता आहे. डीएसके हे एक मराठी उद्योजक आहेत. त्या अर्थाने राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे. फक्त त्याला कायदेशीर दृष्ट्या कितपत महत्व असणार हा प्रश्न आहे.

बैठकीत सुमारे दीडशे ठेवीदार उपस्थित 

कारण डीएसकेंनी केलेल्या फसवणूकीचं प्रकरण आधीच न्यायालयात गेलंय. जवळ जवळ १ हजार ठेवीदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्हामध्ये डीएसके सध्या अटकपूर्व जामिनासाठी लढताहेत. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन आधीच फेटाळलाय. दरम्यान आज राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत सुमारे दीडशे ठेवीदार उपस्थित आहेत. बंद हॉलमध्ये ही बैठक सुरु आहे. माध्यम प्रतिनिधींनाही बैठकीतून बाहेर ठेवण्यात आलय.

दरम्यान, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस.  कुलकर्णी हे आपली संपत्ती विकून गुंतवणुकदारांचे थकीत पैसे देणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या वकीलांमार्फत न्यायालयात देण्यात आली आहे.

एक आठवड्यांचा दिलासा

या अटीवर डीएसके कुलकर्णी यांना एक आठवड्यांचा दिलासा न्यायालयाने दिलाय. कोणत्या संपत्ती विकणार आहेत याची यादी घेऊन कुलकर्णी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहणार आहेत. 

'गुंतवणुकदारांचे पैसे वेळेत परत करा'

यावर संपत्ती विका किंवा इतर पर्याय सांगा पण गुंतवणुकदारांचे पैसे वेळेत परत करा, अशा शब्दात डीएसकेंना न्यायालयाने फटकारले. 

पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

दर महिन्याला गुंतवणुकदारांचे १५ कोटी रूपये परत करु हा डीएसके यांचा तोडगाही न्यायालयाने अमान्य केला.  पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला आहे.