मरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

 शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Apr 10, 2018, 05:20 PM IST
मरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या title=

यवतमाळ: शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे दाखवत विद्यमान सरकार अश्वासनांची खैरात करत आहे. वेळप्रसंगी शेतीपुरक योजनाही जाहीर करत आहेत. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यासमोरचे प्रश्न संपलेत असे चित्र मात्र मुळीच नाही. उलट शेतकरी दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत अधिकच अडकत असल्याचे चित्र आहे. हे चित्र इतके विदारक आहे की, शेतकऱ्याला मरणही स्वस्त नाही असे दिसते. शेती आणि जीवनातील संघर्ष याचा मेळ घालताना नैराश्येत अडकलेले अनेक शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. हे पाऊल मुळीच समर्थनीय नाही. पण, यातही दुर्दैव असे की, आत्महत्या करतानाही शेतकऱ्याचे मरण स्वस्त नाही. यवतमाळध्ये एक शेतकरी आत्महत्या करत असताना दोरी तुटली आणि तो गंभीर जखमी झाला. पण, अशाही स्थितीत त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, या शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

राजूरवाडी इथे ही घटना घडली असून शंकर चायरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नापीकी, दुष्काळ आणि सातत्याने पडत राहणारे शेतमालाचे बाजारभाव यांसह पर्यावरण, जागतिक बाजारपेठ, व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी आदी कारणांमुळे शेतीचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालले आहेत. आजवर अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.