अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Updated: Aug 1, 2017, 08:19 PM IST
अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

पुणे वाहतूक पोलिसांच्या बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईवर आता सवाल उपस्थित करण्यात येतात. पुण्यात वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्ही कंट्रोल रुममधून चौकाचौकातील वाहतूकीवर लक्ष ठेवलं जातं. सप्टेंबर 2016 च्या अखेरीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईस सुरुवात झाली. मागील दहा महिन्यात फक्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून तब्ब्ल दोन लाख 74 हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलीय.

ही कारवाई धडाकेबाज असली तरी सिग्नल तोडणारी गाडी एक आणि दंड दुसऱ्यालाच असे अजब प्रकार होत असल्याचंही आता समोर आलंय. यातूनच रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आलाय. रिक्षाचालकाला 500 रुपयांचं ई-चलान लावण्यात आलंय. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी मात्र याला आक्षेप घेतलाय.  

तांत्रिक चुकीमुळे अशा गोष्टी घडल्या असतील तर चुकीचा दंड झालेल्या वाहन चालकांना दंड बदलून देणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलंय. 

सीसीटीव्ही बरोबरच दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पेपरलेस आणि कॅशलेस कारभार स्वीकारलाय. त्यामुळं बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाईचा आकडा प्रचंड वाढलाय. जानेवारी 2017 पासून  साडेसात लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलीय. तर, त्यांच्याकडून तब्ब्ल सोळा कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय.

ही कारवाई कौतुकास्पद असली तरी त्यालाही आक्षेप घेतला जातोय. वाहतूक पोलीस, वाहतूक नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी आहेत की दंड वसूल करण्यासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.