कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद का होत आहेत ?- सरसंघचालक

. कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे.

Updated: Jan 18, 2019, 09:23 AM IST
कोणतेही युद्ध सुरू नसताना जवान शहीद का होत आहेत ?- सरसंघचालक title=

नागपूर : कुंभ मेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहाकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदीर मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय जवान शहीद होण्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. कोणाशीही युद्ध सुरू नाही मग सध्याच्या घडीला भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत ? असा प्रश्न सरसंघचालकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी याचे उत्तर देखील दिले आहे. आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे होते असे स्पष्टीकरण देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नागपूरमधील प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. 

जवान शहीद होण्याच्या घटना वाढत जात असल्याचे सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या प्रसंगाचा उल्लेख केला. जेव्हा देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळत नव्हते तेव्हा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले जायचे. स्वातंत्र्यानंतर जर कोणत युद्ध झालं किंवा होत असेल तर सीमेवर जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाची सुरक्षा करतात. यानंतर मोहन भागवत यांनी सध्या युद्ध प्रसंग नसताना जवान शहीद होण्यावर प्रश्न उपस्थित केला. 

युद्धाच्या वेळी जवान शहीद होतात पण या घडीला आपल्याकडे कोणते युद्ध सुरू नाही तरीही जवान शहीद होत आहेत याचा अर्थ आपण आपले काम योग्य पद्धतीने करत नाही आहोत. युद्ध नसेल तर सीमेवर सैनिकांचे प्राण जायला नकोत पण असे होत आहे. असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. हे थांबायला हवे. देशाला महान बनवण्यासाठी पाऊले उचलायला हवीत असे आवाहनही त्यांनी केले. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला राजकिय वर्तुळात फार महत्त्व आहे.  जम्मू काश्मीरच्या प्रश्नी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगत मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपवून घेत असते. अशावेळी सीमेवर जवानांच्या शहीद होण्याचा प्रश्न उपस्थित करुन सरसंघचालकांनी सरकारच्या दाव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना आयते कोलित दिले आहे. 

मोदी सरकारच्या सुरूवातीच्या काळातील 3 वर्षांमध्ये म्हणजे मे 2014 ते मे 2017 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 812 दहशतवादी घटना घडल्या. यामध्ये 62 नागरिक मारले गेले तर 183 जवान शहीद झाले. हे आकडे समोर ठेवून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. घाटीतील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची सफाई दरवेळेस सरकारडून देण्यात येते.