वाळूमाफियांचा गोरखधंदा : पावत्या महाराष्ट्राच्या, वाळू गुजरातची

तापी लुटली जातेय... प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

शुभांगी पालवे & Updated: May 26, 2018, 10:56 PM IST
वाळूमाफियांचा गोरखधंदा : पावत्या महाराष्ट्राच्या, वाळू गुजरातची title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात वाळूच्या ठेक्याच्या पावत्या बनवायच्या. आणि वाळू मात्र गुजरातमधून भरण्यचा गोरख धंदा सर्रास सुरु आहे. या आंतरराज्य वाळू तस्करीवर प्रशासनाला अंकुश मात्र मिळवता आलेला नाही. नंदुरबारमधून तापी नदी वाहत गुजरातमध्ये जाते. याच तापीची वाळू थेट मुंबईपर्यंत सोन्याच्या दरात विकली जाते. वाळूचे दर लक्षात घेता महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाळू माफियांनी अनोखा वाळू लुटीचा धंदा शोधून काढलाय. नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवर सावळदामधील वाळू ठेक्याचा लिलाव करण्यात आला. मात्र या ठेक्याच्या फक्त पावत्या वापरल्या जात असून वाळू मात्र गुजरातमधून आणली जातेय. याची कबुलीच वाळू वाहतूक करणारे चालक देत आहेत. निझर, कुकूरमुंड मार्गे गुजरात मधून वाळू थेट नाशिक मुंबईपर्यत नेली जाते. ज्या पावत्या वाळू वाहतूकदारांना देण्यात येत आहेत त्यांची सत्यता देखील पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे. 

गुजरातमध्ये इतर राज्यात वाळू वाहतुकीला बंदी आहे.  मात्र नंदुरबार प्रशासनाच्या वरदहस्तामुळे बेसुमार तापी लुटली जातेय.  ना गुजरातचा आणि महाराष्ट्रातला एकही अधिकारी अथवा यंत्रणा या वाळू तस्करीविरोधात ठाम भूमिका का घेत नाही हादेखील एक मोठा प्रश्न आहे.  

'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असं साटंलोटं महाराष्ट्र आणि गुजरात प्रशासनाचं झाल्यामुळे तापी नदीला कोणी वाली राहिलेलं नाही. यावर आता प्रशासन काय कारवाई करतं? हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.