...पवारांनी पुण्यात भुजबळांची पगडी स्वत: बदलली... पण का?

शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

Updated: Jun 10, 2018, 10:01 PM IST

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन पार पडलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि नुकतेच जेलमधून जामीनावर बाहेर आलेले छगन भुजबळ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

आता पुणेरी पगडी नाही

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार केला. या सत्कारानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यापुढे पुणेरी पगडी न वापरण्याच्या सूचना केल्या. यावेळी पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फुले पगडी दिली आणि यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हीच पगडी वापरण्याचे आदेश दिले. शरद पवारांनी ही फुले पगडी छगन भुजबळांना घातली.