शरद पवारांचा तीन नातवांसह कोकण दौरा, राजकारणाचे दिले धडे!

 पवार आजोबांची बातमी. राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना घेऊन आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत. आपल्या तीन नातवांनासह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला.  

प्रणव पोळेकर | Updated: Dec 4, 2018, 08:57 PM IST
शरद पवारांचा तीन नातवांसह कोकण दौरा, राजकारणाचे दिले धडे!

रत्नागिरी : पवार आजोबांची बातमी. राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना घेऊन आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत. आपल्या तीन नातवांनासह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला. या दौऱ्यात आजोबांसोबत सावलीसारखे वावरणारे नातू काय शिकले याचा हा खास रिपोर्ट.

गेल्या काही दिवसांपासून हे तिघेजण दिवसाचे २४ तास शरद पवारांसोबत फिरत आहेत. सध्या कोकण दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांची पाठ त्या तिघांनी अजिबात सोडलेली नाही. त्यामुळंच हे तिघे नेमके कोण, अशी कुजबूज रंगली होती. त्याचा उलगडा आता झालाय. राजकारणातली पवारांची तिसरी पिढी. पार्थ अजित पवार,
रोहित राजेंद्र पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार. ही शरद पवार आजोबांची नातवंडं.

पार्थ हा अजित पवारांचा मुलगा. रोहित हा पवारांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांचा नातू. तर युगेंद्र हा अजित पवारांच्या धाकट्या बंधूचा मुलगा. खरं तर सध्याचा कोकण दौरा हा पवारांचा राजकीय दौरा नाही. सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांचं काय झालं, हे पाहण्यासाठी पवार कोकणात आलेत. पण तरीही ते तिघेजण कायम पवारांसोबत दिसत आहेत. जणू आपल्या आजोबांकडून महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल समजून घेतायत. याबाबत पवारांकडं विचारणा केली असता त्यांनी अगदी मिश्किल प्रतिक्रिया दिली..

शरद पवार नावाच्या विद्यापीठाचे हे विद्यार्थी. आजोबांच्या केवळ सहवासातून ते आपसूकच राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवतायत. आपल्या आजोबांनी केलेल्या कामाचं कौतुक या नातवंडाच्या चेहऱ्यावरही झळकतंय.

महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्ती भोवती फिरतं, त्या शरद पवारांची तिसरी पिढी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत जाहीरपणं फिरत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या घड्याळातले हे नवे काटे. अलार्म सेट केलाय. आता पवारांची ही नातवंडं सक्रीय राजकारणात कधी गजर करतायत, त्या वेळेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पवार यांचा आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गणपतीपुळ्यातील गणेशाचं दर्शन घेतलं. अर्ध्या तासापेक्षा जास्तवेळ ते गणपतीपुळ्यात उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवार, पार्थ अजित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लंबोदराचं दर्शन घेतल्यानंतर पवार यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या कार्यालयात देवस्थान विकासाबाबत चर्चा केली. यावेळी सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांबाबत शरद पवार यांना माहिती दिली. पवार काही वर्षांपूर्वी गणपतीपुळे इथं आले होते त्यावेळच्या आठवणींना पवार यांनी यावेळी उजाळा दिला. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close