नागपूर दौऱ्यावरून प्रणव मुखर्जींना मुलीकडून सूचना वजा सल्ला

'नागपुरात जाऊन तुम्ही भाजप / आरएसएसला खोट्या कहाण्या रचण्यासाठी खुली सूट देत आहात'

Updated: Jun 7, 2018, 09:04 AM IST
नागपूर दौऱ्यावरून प्रणव मुखर्जींना मुलीकडून सूचना वजा सल्ला title=

मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज आरएसएसच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात दाथल होणार आहेत. यावर त्यांची मुलगी आणि दिल्ली काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. माजी राष्ट्रपतींचा हा दौरा 'भगव्या विचारधारेला प्रोत्साहन' देण्यासारखंच असल्याचं शर्मिष्ठा यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर शर्मिष्ठा यांनी आपलं मत व्यक्त केलंय. नागपुरात जाऊन तुम्ही भाजप / आरएसएसला खोट्या कहाण्या रचण्यासाठी खुली सूट देत आहात, अशी सूचना वजा सल्लाही शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांना दिलाय.

'तुम्ही त्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्याल, यावर खुद्द आरएसएसचाच विश्वास नाही... लोक भाषण विसरून जातील पण फोटो मात्र नेहमीसाठीच राहतील आणि त्यांना चुकीच्या वक्तव्यांसहीत पसरवलं जाईल' असं त्यांनी आपलं ट्विटमध्ये म्हटलंय.

काँग्रेससहीत अनेक विरोधीपक्षांच्या नेत्यांनी माजी राष्ट्रपतींच्या आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. बुधवारीच प्रणव मुखर्जी नागपुरात दाखळ झालेत. शैक्षणिक पाठ्यक्रमाचा तिसऱ्या वर्गात पास झालेल्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांना यावेळी प्रणव मुखर्जी संबोधित करणार आहेत. ही ट्रेनिंग पास करणारे कार्यकर्ते पुढे आरएसएसचे प्रचारक म्हणून काम करतात.