'मुख्यमंत्री औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव कधी बदलणार ?'

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Updated: Nov 8, 2018, 04:22 PM IST
'मुख्यमंत्री औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव कधी बदलणार ?'

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नाव बदलली गेल्यानंतर आता शिवसेनेने महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्यास सुरूवात केली आहे. 'औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव कधी बदलणार ?' असा प्रश्न शिवसेनेतर्फे आज विचारण्यात आला. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून अयोध्या केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचं नाव बदलून अयोध्या केलंय. मग मुख्यमंत्री फडणवीस औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धराशिव नगर कधी करणार आहेत ?' असा प्रश्न त्यांनी केलायं. 

नाव बदलण्याची मागणी 

उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावे बदलल्यानंतर देशातील अनेक भागातील शहरांचे नामकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती करण्याची इच्छा व्यक्त केलीयं.

उत्तर प्रदेशमध्येही आग्रा, आजमगड आणि सुल्तानपुर शहरांची नावे बदलण्याची मागणी होतेयं.

या शहरांचीही इच्छा 

अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यासाठी सरकार कायदेशीर बाबी पाहत असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पत्रकारांना सांगितले.

हिमाचल प्रदेश सरकारदेखील आपली राजधानी शिमलाचे नाव बदलून 'श्यामला' करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील पश्चिम बंगालचं नाव बदलून 'बांग्ला' करु इच्छित आहेत. या प्रस्तावावर अद्याप केंद्र सरकारची मंजूरी मिळाली नाही.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close