'बालरंगभूमीचे जनक' श्रीनिवास शिंदगी यांचं निधन

श्रीनिवास शिंदगी यांच्या कार्याची दखल घेऊन 'झी २४ तास'ने २०१५ साली 'अनन्य सन्मान पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव केला होता

Updated: Jul 12, 2018, 09:12 AM IST
'बालरंगभूमीचे जनक' श्रीनिवास शिंदगी यांचं निधन

सांगली : साहित्यिक आणि 'बालरंगभूमीचे जनक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनिवास शिदंगी यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते... तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. श्रीनिवास शिंदगी यांच्या कार्याची दखल घेऊन 'झी २४ तास'ने २०१५ साली 'अनन्य सन्मान पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव केला होता.

रंगभूमीवरची एक चळवळ

'बालरंगभूमीचे जनक' म्हणून ओळख असणारे श्रीनिवास शिंदगी यांनी गेली ६० वर्ष ही चळवळ अविरत सुरु ठेवली होती. या चळवळीच्या माध्यमातून शेकडो बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे दिले. शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक नाटक गाजली आहेत. शिंदगी सरांच्या मार्गदर्शनाखाली बाल वयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेक जण पुढे कलाकार दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक पुढे झाले.

शिंदगी यांचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून नाटककार केशवराव दाते यांनी 'बालरंगभूमीचे जनक' अशी उपाधी दिली होती. शिंदगी यांनी अनेक कथा, कविता, कविता संग्रह, गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचं व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे.

रंगभूमीवरचे नवनवे प्रयोग

मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्ड सहाय्याने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनीच केला. बालनाट्य 'पुंगीवाला' ही अजरामर कलाकृती शिंदगी यांचीच... या पुंगीवाला बालनाट्याचे शेकडो प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केलं होतं. पुंगीवाला हे बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणार पाहिलं बालनाट्य आहे. अनेक सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी शिंदगी यांच्या अनेक बालनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आलेत.

नाटकं आणि बालनाट्य

श्रीनिवास शिंदगी यांनी आजवर २० नाटके लिहिली त्यापैंकी १५ बालनाट्ये आहेत. त्यांचं पुंगीवाला हे नाटक इतक्या उच्च अभिरुचीचे होतं की ते ख्यातनाम अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केलं. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार गेल्या ६० वर्षापासून घडवण्याचं काम केलं. 

'दहालाखाचा धनीट या  नाटकाच्या वेळी शिंदगी यांनी आधुनिक तंत्राचा पहिल्यांदा वापर केला. प्रख्यात अभिनेत्री व 'सौंदर्याचा अॅटमबॉम्ब' म्हणून ज्यांनी रंगभूमीवर व चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली त्या पद्मा चव्हाण यांनी रंगमंचावर पहिली एन्ट्री याच नाटकातून घेतली होती हे विशेष...

साहित्य,  लेखन, अभिनय याच बरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारावतन, वंदेमातरण हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार करून त्याचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. या कार्यक्रमाच्या ध्वनिफिती ही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी , जंगलगाणी , मिठाईचे घर, गणपती बाप्पा क्रिकेट खेळुया याही ध्वनिफितींची त्यांनी निर्मिती केलेली आहे.

सामाजिक भान

श्रीनिवास शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत 'भूमिपुत्रांचे वनपूजन' हे संगीतमय बालनाट्य लिहलं. या बालनाट्याला महाराष्ट्र राज्यशासनाचा उत्कृष वाड्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला आहे.

श्रीनिवास शिंदगी यांनी बालकुमार साहित्य संमेलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. बालकांच्या भावजीवनाशी निगडीत असा 'गाण्यांचा गाव' नटवर्य केशवराव दाते यांच्या प्रेरणेनं शिंदगी यांनी सांगलीत आद्य बाल रंगभूमीची स्थापना केली. 'काव्यदर्शन' व गोष्टी शब्द स्वरांच्या रचणारे एक सुरेल साहित्यिक अशी श्रीनिवास शिंदगी यांची ओळख होती. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close