केवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोरीला

नाशिक शहरात सकाळी केवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोऱ्या झाल्या. शहरात हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नाकाबंदी करून लाखो रूपयांचा महसूल गोळा केला जातोय. 

Updated: Sep 14, 2017, 10:08 PM IST
केवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोरीला

मुकूल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात सकाळी केवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोऱ्या झाल्या. शहरात हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नाकाबंदी करून लाखो रूपयांचा महसूल गोळा केला जातोय. 

मात्र पोलिसांच्या या नाकाबंदीतून नेमके सोनसाखळी चोर कसे सुटतात याचं कोडं नाशिककरांना उलगडत नाही. सकाळी पावणेसात ते साडेसात या ४० -४५ मिनिटाच्या कालवधीत एक दोन नाहीतर तब्बल अर्धाडझन महिलांच्या अंगावरील सोनसाखळी चोरून चोरटे पसार झालेत. 

गंगापुररोड  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापुररोड, कॉलेजरोड पासून ह्या चोरीला सुरवात झाली, त्याचाशेवट भद्रकाली पोलीस ठ्ण्याच्या हद्दीतील काठेगल्ली आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टकलेनगर जवळ झाला. 

या महिला कोणी देवदर्शनासाठी तर कोणी  मोर्निग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. गेल्या आठ दिवसात दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या डिक्कीतून लाखो रुपये लंपास झाले आहेत. नाशिक पोलिसांना सध्या जिथे तिथे नाकाबंदी केली आहे. हेल्मेटसक्तीसाठी दंड वसूल केला जातोय. पण या सगळ्यातून नेमके चोर कसे सहीसलामत निसटतात याचा उलगडा पोलिसांना होत नाही. 

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरात एक तासात तीन सोन साखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर घरफोडीचे सत्र सुरूच होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या टोळीचे चेहरे दिसतायेत तरी देखील पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत. त्यामुळे पोलीस केवळ सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करून वसुली करण्यासाठी आहेत कि  गुन्हेगारांवर कारवाई कारवाई करण्यासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय.