...म्हणून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरसमोर ढकलले

वाशिममधला धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Jun 22, 2018, 09:36 PM IST
...म्हणून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरसमोर ढकलले title=

वाशिम : शेतीच्या वादावरुन चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली लोटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे २१ जून रोजी हा प्रकार घडला. शेतीची मालकी आणि त्यावर पेरणीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. सदर जमीन महादेव लक्ष्मण राऊत यांनी कैलास दळवी यांना कसण्यासाठी दिली होती. परंतु ती परत देण्यास दळवी नकार देत असल्याने राऊत यांनी सदर प्रकरण तहसीलमध्ये नेले. येथील निकाल आपल्या बाजूने लागल्याचे सांगत पेरणीसाठी राऊत शेतात गेले असता दळवी तेथे आले आणि त्यांनी पेरणीस विरोध दर्शवित स्वत:च्या आईलाच पेरणी करीत असलेल्या ट्रॅक्टरसमोर ढकलले.

राऊत यांनी दळवी पतीपत्नीला झाडाला बांधून मारहाण केल्याचं देखील समोर आलं आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दळवी आणि राऊत कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरु केला आहे.