पुण्यात एसआरएचे नियम तुडवले पायदळी

पुण्यातील एक सुखवस्तू, धनदांडगा व्यावसायिक झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए योजनेचा लाभार्थी ठरलाय.

Updated: Jun 13, 2018, 10:05 PM IST
पुण्यात एसआरएचे नियम तुडवले पायदळी

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातील एक सुखवस्तू, धनदांडगा व्यावसायिक झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए योजनेचा लाभार्थी ठरलाय. या व्यावसायिकाची पुण्यात अनेक दुकानं आणि फ्लॅट आहेत. तरीही , तो एसआरएमध्ये लाभार्थी ठरलाय. त्यासाठी पुण्यात कुठलीच मालमत्ता नसल्याचं शपथपत्र ही दिलं आहे. विशेष म्हणजे या एसआरए योजनेचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. 

औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहत... या ठिकाणी एसआरए प्रकल्प होतोय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एसआरए प्रकल्प होत आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्याचं उदघाटन केलंय. मात्र गेल्या दोन वर्षातल्या लाभार्थ्यांची यादी पाहिली तर एसआरएचे नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट होतंय. मुलभूत नियमानुसार एसआरएमध्ये घर किंवा दुकान मिळवण्यासाठी स्वतःच्या अथवा कुटुंबातल्या कोणाच्याही नावे मालमत्ता नसावी. मात्र औंधमध्ये ज्यांच्या दुकानाच्या नावे परिहार चौक आहे... ज्यांचे एक दोन नाही तर तब्बल ६ फ्लॅट आहेत, पुण्यात अनेक दुकानं आहेत, त्यांना या यादीत दुकान देण्यात आलंय. 

योजना राबवण्यापूर्वी अर्जदाराकडून शपथपत्र घेतली जातात. औंधमधल्या प्रसिद्ध परिहार स्वीट्सच्या मालकांनी स्वतःच्या मालकीची दुकानं, घरं नसल्याचं खोटं शपथपत्र एसआरएला दिलंय. मात्र तक्रारीबाबत विचारणा केल्यावर असा कुठलाच नियम असल्याचं आपल्याला माहिती नाही असा दावा त्यांनी केलाय. 

एसआरएचा भोंगळ कारभार याआधीही अनेकदा समोर आलाय. याही प्रकरणात तक्रारकर्त्यांनाच कागदपत्र शोधायला सांगण्यात आलंय. त्यानंतरही प्रकार उघडकीला आल्याने आता कारवाई करण्याचं केवळ आश्वासन देण्यात येतंय. मी लाभार्थी... या जाहिरातबाजीवरून सरकारवर सातत्याने टीका झालीय. आता हा लाभार्थी ही त्याची पुढची पायरी आहे... एकूणच या निमित्ताने स्मार्ट सिटीचा ओव्हरस्मार्टपणा उघड झालाय.