मुलाची आठवण जपण्यासाठी तन्ना दांपत्य करतात 'ही' समाजसेवा!

दमयंती आणि प्रदीप तन्ना यांनी सात वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात आपला एकूलता एक मुलगा गमावला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 25, 2017, 04:55 PM IST
मुलाची आठवण जपण्यासाठी तन्ना दांपत्य करतात 'ही' समाजसेवा! title=
फोटो सौजन्य : ANI

मुंबई : दमयंती आणि प्रदीप तन्ना यांनी सात वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात आपला एकूलता एक मुलगा गमावला. मुलगा गेल्याचं दु:ख आणि निर्माण  पोकळी कधीही भरून निघण्यासारखी नव्हती. पण त्यामुळे खचून न जाता त्या जोडप्याने ज्येष्ठ नागरिक आणि गरिबांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलं.

त्यांचा मुलगा निमेश याचा २०११ मध्ये चालत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. निमेशची आठवण जपण्यासाठी दमयंती आणि प्रदीप यांनी मोफत जेवणाचा डब्बा पुरवण्याची सेवा सुरू केली. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या ११० ज्येष्ठ नागरिकांना ते मोफत जेवण पुरवतात. ज्या वृद्धांना त्यांच्या मुलांनी सोडून दिलंय किंवा ज्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांची ते काळजी  घेतात. दमयंती आणि प्रदीप यांनी गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम चालवत असल्याचे ‘एएनआय’ वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे दरमहिन्याला तन्ना दांपत्य १०० गरीब कुटुंबांना मोफत किराणा पुरवतात. आदिवासी पाड्यातील मुलांना वह्या, पुस्तकं, कपडे आणि शक्य तेव्हडी मदत करतात. या चांगल्या कामात तन्ना दाम्पत्यांना  नातेवाईक आणि मित्रपरिवाराची अनेकदा साथ मिळते. 

''आमचा एकूलता एक मुलगा तर गेला, पण त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा आम्ही गरिब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला,'' असं ते अभिमानानं सांगतात. तन्ना कुटुंबियांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला असला तरी समाजसेवेतून त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी कायम जिवंत ठेवल्या आहेत.