भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

धकाते यांची तब्बल ३७९ चौरस मीटर जमीन रस्त्यासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे

Updated: Jul 18, 2018, 10:09 AM IST
भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये! title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : राज्य सरकार कधी कधी सामान्य जमीन मालकांची कशी थट्टा करतं, याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूर-उमरेड रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सध्या भूसंपादनाची प्रकिया सुरू आहे. नागपूर शहरालगतच असलेल्या कळमन्ना ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एका जमिनीसाठी मालकाला केवळ दोन रूपये मोबदला देण्याचा प्रताप भूसंपादन अधिकाऱ्यांनी केलाय. ताराचंद धकाते असं या जमीन मालकाचं नाव आहे. 

धकाते यांची तब्बल ३७९ चौरस मीटर जमीन रस्त्यासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे. रेडी रेकनरनुसार या जागेचा दर प्रति चौरस मीटरला ३ हजार ८५० रुपये असा आहे. या हिशेबाने धकाते यांच्या जमिनीची किंमत होते सुमारे १५ लाख रूपये... 

भूसंपादन नियमानुसार पाच पट मोबदला धरला तर या जमिनीला सुमारे ७२ लाख रूपये एवढा मोबदला मिळायला हवा होता. मात्र धकाते यांना केवळ २ रुपये मोबदला देण्याची नोटीस काढून भूसंपादन विभागानं त्यांची क्रूर थट्टा केलीय. 

ही थट्टा एवढ्यावरच थांबत नाही. हा दोन रुपयांचा मोबदला मिळवण्यासाठी धकाते यांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यायचंय, शिवाय १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागणार आहे.

या धक्कादायक प्रकाराचा कळमन्ना इथं जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी...