ठाणं आता होणार आणखी हिरवंगार

पर्यावरणाच्या दिशेनं चांगली वाटचाल करत असलेलं ठाणं आता आणखी हिरवंगार होणार आहे... ठाण्यात किमान पंचवीस ते तीस हजार झाडं नव्यानं लावली जाणार आहेत... 

Updated: Jan 20, 2018, 10:56 AM IST
ठाणं आता होणार आणखी हिरवंगार title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पर्यावरणाच्या दिशेनं चांगली वाटचाल करत असलेलं ठाणं आता आणखी हिरवंगार होणार आहे... ठाण्यात किमान पंचवीस ते तीस हजार झाडं नव्यानं लावली जाणार आहेत... 

ठाण्यात नुकतंच वृक्षवल्ली प्रदर्शन पार पडलं..... त्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त प्रकारची झाडं विक्रीला ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला होता. ठाणं हिरवंगार व्हावं, जास्तीत जास्त ठाणेकरांनी त्यांच्या घरी किंवा आवारात झाडं लावावी, ठाण्यातलं प्रदूषण कमी व्हावं, यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली दहा वर्षं अशा प्रकारचं प्रदर्शन ठाण्यात भरवलं जातं. यंदा या प्रदर्शनात झाडांची विक्रमी विक्री झाली..... पंचवीस ते तीस हजार झाडं ठाणेकरांनी खरेदी केली.... 

या प्रदर्शनात वामन वृक्ष, निवडुंग, ऑर्किड, गुलाब, झेंडू, शोभेची फुलं, औषधी वनस्पती, वंगवेगळ्या रंगाचा मोगरा ,जाई जुई ,जास्वंद ,रान मोगरा ,गावठी झेंडू अशा  विविध प्रकारची झाडं इथे विक्रीला होती.  त्याबरोबरच भाजीपाला उद्यानाची प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित फोटो,  औषधाची वनस्पतींची माहितीही या प्रदर्शनात देण्यात आली. विशेषतः ठाण्यातल्या लहान मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देशही या प्रदर्शनामागे होता. 

ठाणेकरांचा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.... आता ही झाडं ठाणेकरांच्या घरी, गच्चीवर आणि अंगणात फुलणार आहे... यानिमित्तानं ठाणे हिरवंगार करण्यासाठी ठाणेकरांनी एक पाऊल पुढे टाकलंय.