पालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट

महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...

Updated: Nov 7, 2017, 10:49 PM IST
पालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट

विशाल करोळे / औरंगाबाद  : महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...

औरंगाबाद महापालिकेच्या शाळा विकणे आहे. ऐकून धक्का बसला ना..? पण हे खरंय... औरंगाबाद महापालिकेनं आपल्या दोन शाळा विकायला काढल्यात... त्यातली ही पहिली सिडको एन 9 भागातली 5 एकरात असलेली शाळा.14 खोल्यांची ही शाळा. चांगली इमारत. एरव्ही अनेक शाळांना नसणारं मोठं पटांगण. पण ही शाळा बंद असल्याचं कागदोपत्री दाखवलं जातंय. अत्रिणी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था या खासगी संस्थेला महापालिकेनं ती देवून टाकलीये.

याठिकाणी ही खासगी संस्था, सीबीएसई पॅटर्नची इंग्रजी शाळा काढणाराय. या संस्थेकडून महापालिकेला शासकीय दरानं भाडंही मिळेल, असं महापालिका सांगतेय. पण त्याशाळेत अजूनही 50 विद्यार्थी शिकतायत. ही शाळा खासगी संस्थेला देण्याच्या प्रकारामुळं शाळेच्या मुख्याध्यापकांनाही धक्का बसलाय.
 
महापालिका आणि खासगी संस्था यांच्यात भाडेकरार झालाय का, झाला असल्यास तो किती दिवसांचा आहे, किती विद्यार्थ्यांना सीबीएसईचं मोफत शिक्षण देणार हे सगळंच गुलदस्त्यात आहे... असं असताना शाळा खासगी संस्थेला देण्यामागं फायदा कुणाचा, असा प्रश्न पडतो.

ही शाळा खासगी संस्थेला बहाल करण्यात बराच गोलमाल झाल्याचं सांगितलं जातंय. 20 जुलै 2017 च्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे तत्कालिन महापौर भगवान घडामोडे यांनी ऐनवेळी हा प्रस्ताव आणून तो गुपचूप मंजूर करून घेतला. शिवसेनेच्या आक्षेपाला चक्क केराची टोपली दाखवण्यात आली.
 
याआधी महापालिका पदाधिकाऱ्यांनी अशीच महापालिकेची एक शाळा मोठ्या अधिका-याच्या खासगी संस्थेला गुपचूप देवून टाकली... गोरगरीब मुलांसाठी सुरू केलेल्या या महापालिकेच्या शाळा... त्यांचं असं खासगीकरण होत गेलं तर गरीब मुलांनी शिकायचं तरी कुठं? 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close