कसा होता तुकाराम मुंढेंचा नाशिकमधील पहिला दिवस?

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची एन्ट्रीच मोठी धडाकेबाज होती... पहिल्याच बैठकीत मुंढेंनी शिस्तीचा बडगा काय असतो ते दाखवून दिलं... 

Updated: Feb 9, 2018, 08:06 PM IST
कसा होता तुकाराम मुंढेंचा नाशिकमधील पहिला दिवस?

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची एन्ट्रीच मोठी धडाकेबाज होती... पहिल्याच बैठकीत मुंढेंनी शिस्तीचा बडगा काय असतो ते दाखवून दिलं... 

कसा होता पहिला दिवस?

दहाचा ठोका वाजला आणि तुकाराम मुंढे आपल्या तडफदार शैलीत महापालिकेत आले. आल्यावर लगेच पाण्याचं लिकेज, पायदानावरची धूळ दाखवत विभाग प्रमुखांच्या बैठकीला सुरूवातही केली... बैठकीला सुरूवात करतानाच अग्निशमन सुरक्षा विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांना खांद्यावरचे बिल्ले नसल्याने त्यांनी परत पाठवलं... गणवेशात या असं बजावत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला... त्यानंतर बांधकाम विभागाला फैलावर घेतलं... शिस्त पाळण्याबाबत बजावलं... वेळ पाळण्याचा सल्ला दिला. फायलींच्या प्रवासात कोणीही आडवं येणार नाही असा इशाराही दिला. 

नागरिकांना आवाहन

रस्त्यावरील पार्कींगसाठी पाचपट शुल्क आकारणार असल्याचं सांगत प्लॅस्टीक बंदी काटेकोरपणे राबवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कचरा विलगीकरण घरातच लोकांनी करावं असं आवाहनही त्यांनी केलं. नाशिकमध्ये भाजप सत्तेत आहे. त्यातच आता तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्याने विरोधकांचा स्वर धारदार झालाय. तर सत्ताधारी भाजपने तुकाराम मुंढे यांचं स्वागत केलंय.

कशी ठरणार कारकिर्द?

मंदिरांच्या नगरीत आता मुंढे यांच्या कारकिर्दीत रामराज्य येणार की राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडणार याची उत्सुकता आहेच. मात्र पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा दणका काय असतो याची चुणूक अनुभवायला मिळाली.