मुढेंनी आल्याआल्या महापालिकेतल्या देवदेवतांचे फोटो हटवले

नाशिक शहरात तुकाराम मुंढे यांचं सिंघमराज सुरू झालंय. पहिल्याच आठवड्यात महापालिकेत देवदेवतांचे फोटो काढण्यास सांगितलंय. इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय. सुट्टीच्या दिवशीही स्वतः काम करत स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न सुरू केलेत. सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा काढत एक दिवसाच्या पगार कपातीचे आदेश काढलेत. 

Updated: Feb 13, 2018, 10:10 PM IST
मुढेंनी आल्याआल्या महापालिकेतल्या देवदेवतांचे फोटो हटवले

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात तुकाराम मुंढे यांचं सिंघमराज सुरू झालंय. पहिल्याच आठवड्यात महापालिकेत देवदेवतांचे फोटो काढण्यास सांगितलंय. इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय. सुट्टीच्या दिवशीही स्वतः काम करत स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न सुरू केलेत. सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा काढत एक दिवसाच्या पगार कपातीचे आदेश काढलेत. 

महाशिवरात्रीनिमित्त शासकीय सुट्टी असतानाही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदावरीच्या किनारी हजेरी लावली. गोदासफाईच्या कामाची त्यांनी पाहणी केली. घारपुरे घाट ते टाळकुटेश्वरपर्यंत पायी चालत त्यांनी कचरा, निर्माल्य, प्रदूषणाची पाहणी केली. स्मार्ट सिटीच्या प्रारूप आराखड्यात गोदापात्रात सुशोभीकरणात एकही गटार पात्रात येणार नाही असा विश्वासही दिला. 

महापालिकेच्या केवळ इमारतीची झाडाझडती न घेता गोदापात्रात कायमस्वरूपी प्रदूषण हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आवश्यक यंत्रसामग्री घेण्याची तयारी दाखवली. 

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी मुंढे यांनी चक्क देवदेवतांची छायाचित्रं हटवण्याच्या सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केलीय. 

हरीत लवादाने आत्तापर्यंत महापालिका आणि सरकारला दोषी ठरवत गोदाप्रदूषणाबाबत अनेकदा नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे मुंढे यांनी धडाडीने सुरू केलेल्या कामामुळे नाशिक खरंच 'स्मार्ट' होईल, असा प्रश्न नागरिकांना पडलाय.