तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर चालकासह दोघांना  नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Nov 1, 2018, 09:55 PM IST
तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक title=

नागपूर : तहसीलदारांना टिप्परवर लटकलेल्या अवस्थेत १५ किलोमीटर लांब घेऊन जात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, नागपूर ग्रामीण पोलिसांनी टिप्पर चालकासह दोघांना अटक केली आहे. शाहरुख शेख आणि अविनाश ढोणे अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. उमरेडचे  तहसीलदार प्रमोद कदम आणि नायब तहसीलदार योगेश शिंदे यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मंगळवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी कारवाई केली होती. 

उमरेड येथे वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. वाळू माफियांनी नायब तहसीलदार शिंदे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तर तहसीलदार प्रमोद कदम वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी  ड्रायव्हरच्या बाजूने चढले असताना चालकानं सुमारे १५ किलोमीटर त्यांना डंपरवर अडकवून तसाच डंपर सुसाट घेवून गेला. सुदैवानं प्रमोद कदम यांनी डंपरची गती धीमी झाली असताना उडी मारल्यानं त्यांचा जीव वाचला.

तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसिलदार योगेश शिंदे यांना पवनी नदी घाटातून वाळू माफिया अवैधरित्या वाळू घेवून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी वाळू भरलेला डंपर उमरेड रेल्वे क्रॉसिंगवर थांबवला. तहसीलदार प्रमोद कदम यांनी डंपरला यावेळी अडविले.