'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार

'ट्राय'च्या नव्या नियमानुसार वाहिनी पाहण्याचा अधिकार ग्राहकांच्या हाती

Updated: Dec 27, 2018, 11:27 AM IST
'ट्राय'विरोधी बंदमधून विदर्भातील केबल चालकांची माघार  title=

मुंबई : ट्रायच्या नव्या नियमांचा विरोध करण्यासाठी राज्यातल्या केबल चालकांनी पुकारलेल्या तीन तास केबल बंद आंदोलनातून विदर्भातल्या केबल चालकांनी माघार घेतलीय. त्यामुळे विदर्भात आज संध्याकाळी सात ते १० या काळात ब्लॅकआऊट नसेल. उत्तर भारतील संघटनांनी आधीच बंदमधून माघार घेतलीय.

टीव्हीवर दिसणार मुंग्या

आज संध्याकाळी सात ते दहा या वेळेत तुमच्या टीव्हीवर बऱ्याच वर्षांनी मुंग्या दिसणार आहेत. ट्रायच्या नव्या नियमानुसार ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या निवडून तेवढेच पैसे मोजण्याचा अधिकार देण्यात आलाय... पण त्याला केबल ऑपरेटर्सचा विरोध आहे. ट्राय म्हणजे दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आणलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक ग्राहकाला आपली आवडती वाहिनी निवडण्याचा अधिकार देण्यात आलाय. त्याची अंमलबजावणी २९ डिसेंबरपासून होतेय. यातून येणाऱ्या महसुलाची वाटणी ही ८० टक्के संबंधित वाहिनीला आणि २० टक्के केबल ऑपरेटर्स, डिस्ट्रिब्युटर्सना अशी असेल... ज्याला केबल चालकांनी विरोध केलाय.

ही नियमावली ग्राहक हिताची नसून त्यामुळे दरवाढ होणार असल्याचं केबल चालकांचं मत आहे. याला विरोध करण्यासाठी गुरूवारी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद ठेवलं जाणार आहे.

'तुमचं चॅनेल, तुमचा अधिकार'

ट्रायने देशभरात केलेल्या सर्व्हेनुसार ९० टक्के ग्राहक हे ५० पेक्षा अधिक वाहिन्या पाहत तर नाहीतच शिवाय ते चॅनल सर्फिंगही करत नाहीत. त्यामुळेच 'तुमचं चॅनेल, तुमचा अधिकार' हा नियम आणला गेलाय. यामुळे चॅनेल निवडीचा हक्क ग्राहकांना राहणार आहे. जे चॅनेल पहायचं त्याचेच पैसे द्यायचे. १३० रूपयांत १०० फ्री टू एअर चॅनेल पाहता येणार. पे चॅनेल पाहायचे असतील तर चॅनेलनुसार पैसे द्यावे लागतील. परंतु एका चॅनेललासाठी १९ रूपयांपेक्षा जास्त रक्कम आकारता येणार नाही. यामुळं सर्वच गोष्टीत पारदर्शकता येणार आहे. 

पॅकेजच्या नावाखाली सध्या पाहायच्या नसलेल्या वाहिन्याही गळ्यात मारल्या जातायत... त्यामुळेच नव्या नियमानुसार वाहिनी पाहण्याचा अधिकार ग्राहकांच्या हाती राहणार आहे.