पश्चिम महाराष्ट्र राजकीय सत्तेचा आखाडा, एक रिपोर्ट

असं म्हणतात की निवडणुकांची सर्वात आधी चाहूल कुणाला लागत असेल तर ती राजकारण्यांना !!!. म्हणूनच नुकताच राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी एकाचवेळी केलेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनलाय. 

Updated: Nov 28, 2017, 10:39 PM IST
पश्चिम महाराष्ट्र राजकीय सत्तेचा आखाडा, एक रिपोर्ट

दिनेश दुखंडे / प्रताप नाईक, कराड : असं म्हणतात की निवडणुकांची सर्वात आधी चाहूल कुणाला लागत असेल तर ती राजकारण्यांना !!!. म्हणूनच नुकताच राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी एकाचवेळी केलेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनलाय...याला योगायोग म्हणावं की अजून काही ? पाहुयात एक रिपोर्ट.  

पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला

महाराष्ट्राचं राजकीय वातावरण एकीकडे तापत असताना, राज्याच्या तीन मोठया नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेचा आखाडा नुकताच ढवळून काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आणि आपापल्या पक्षासाठी संघटन आणि राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

पवारांची खेळी, ठाकरेंची राजकीय कोंडी 

उध्दव ठाकरे आपल्याला भेटून गेले आणि भाजपच्या सत्तेत शिवसेनेचा जीव रमत नाहीए असं ते आपल्याला म्हणाले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला नुकताच केला. पवारांच्या खेळीमुळे उध्दव ठाकरेंची चांगलीच राजकीय कोंडी केली आहे, असं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे. पवार फक्त हे करून थांबले नाहीत, तर त्यांनी दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत भेट घेतली. आणि सर्वांना बुचकळ्यात टाकलं.

शरद पवारांवर तुफान टीका 

त्यामुळे डिवचलेले उध्दव ठाकरे शरद पवारांवर सध्या तुफान टीका करताहेत. ठाकरेंनी नुकत्याच केलेल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात ते अनुभवास आलं...पवारांप्रमाणेच फडणवीसही ठाकरेंच्या निशाण्यावर होते. योगायोग म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरु असताना त्याचवेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हेही पश्चिम महाराष्ट्रात तळ ठोकून होते. आपापल्या पद्धतीनं या दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

पवारांकडून भेटीचा गौप्यस्फोट

पवारांनी केलेला भेटीचा गौप्यस्फोट ठाकरेंना रुचला नसला, तरी कालांतरानं उघड झालेल्या पवार-ठाकरे गुप्त भेटीमुळे भाजप नेत्यांच्या गोटातही सावध अस्वस्थता आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय, असं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवंगत नेत्याला श्रध्दांजली वाहिली हेही महत्त्वाचं मानलं पाहिजे, कारण शरद पवार स्वत:ला यशवंतराव चव्हाण यांचे पट्टशिष्य म्हणवतात.

मराठा समाजाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न 

मराठा समाजाला चुचकारल्याशिवाय आपली पुढची वाटचाल निर्विघ्न असणार नाही, हे  मुख्यमंत्रयांच्या लक्षात आलंय. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या दौऱ्यात आवर्जून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर येऊन अभिवादन केलं आणि मध्यंतरी दुखावल्या गेलेल्या मराठा समाजाशी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय..
 
राजकीय नेत्यांच्या या दौऱ्यातून एक बाब स्पष्ट होते ती ही की, काहीही झाले तरी अजूनही राज्याच्या राजकारणाची सर्व सूत्रं पश्चिम महाराष्ट्रातूनच हलत असतात. आणि तिथल्या मातीतच राजकीय पैलवानीचे धडेही मिळतात .