नेमकं काय आहे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'?

मुंबईत ऱविवारपासून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही गुंतवणूकदार परिषद सुरू होत आहे. या परिषद माध्यमातून ३५ लाखांचा रोजगार आणि १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 17, 2018, 10:51 PM IST
नेमकं काय आहे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'? title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईत ऱविवारपासून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही गुंतवणूकदार परिषद सुरू होत आहे. या परिषद माध्यमातून ३५ लाखांचा रोजगार आणि १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. 

महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही गुंतवणूक परिषद मुंबईत आयोजित केली आहे. १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेची वैशिष्ट्यं...

- परिषदेत एकूण ४ हजार सामंजस्य करार होणार आहेत 

- त्यातून १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ३५ लाखांचा रोजगार अपेक्षित आहे 

- राज्य सरकारनं या परिषदेत वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, संरक्षण उत्पादन आणि खाद्यान्न प्रक्रिया क्षेत्रांवर भर दिलाल आहे  

- यंदा सूक्ष्म, मध्यम आणि लघूउद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे

बड्या उद्योजकांची उपस्थिती 

- या परिषदेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, महिंद्राचे आनंद महिंद्रा यांच्याखेरीज इतरही मोठ्या उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. 

- व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर, जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनिनो लॅम्बोर्घिनी हेही या परिषदेताल उपस्थित असतील 

- सोबतच स्वीडनचे सचिव कॅरीन रोडिंग, कॅनडाचे लघुउद्योग मंत्री बार्दिश चॅग्गर, तसंच नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत ही उपस्थित राहणार आहेत 

मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक होण्यासाठी ही परिषद उपयोगी ठरेल, असा दावा राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी केला आहे. मोठा गाजावाजा करत दोन वर्षांपूर्वी याच कालावधीत मुंबईत घेण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया' परिषदेतले ५५ टक्के प्रकल्प मार्गस्थ झाल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. प्रत्यक्षात मात्र 'मेक इन इंडिया'ने फार यश मिळवलेलं दिसून येत नाही. राज्यातील सेझ, एमआयडीसीच्या पडिक जमिनी, महाग वीज, पायाभूत सुविधा अशा अनेक समस्या उद्योग विश्वासमोर आहेत. त्यामुळे मॅग्नेटीक महाराष्ट्रही 'मुंगेरीलाल के हसीन सपने' होऊ नयेत, हीच अपेक्षा.