पिस्तूलचा धाक दाखवून 'झी २४ तास'च्या वृत्त निवेदकाला लूटलं

 'झी २४ तास'चे वृत्तनिवेदक गिरीश निकम गेल्या सोमवारी पुण्याहून खारघर इथे आपल्या घरी परतत होते. 

Updated: Jul 19, 2018, 09:14 PM IST
पिस्तूलचा धाक दाखवून 'झी २४ तास'च्या वृत्त निवेदकाला लूटलं title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : पुणे स्वारगेट येथून खाजगी प्रवासी कारने खारघर येथे येणारे, झी मीडियाचे प्रतिनिधी गिरीश निकम यांना मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर कारमधील चौघा लुटारुंनी गनचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 'झी २४ तास'चे वृत्तनिवेदक गिरीश निकम गेल्या सोमवारी पुण्याहून खारघर इथे आपल्या घरी परतत होते. 

रात्री १० च्या सुमाराला स्वारगेट स्थानकावर ते बसची वाट पाहात होते. त्याचवेळी खासगी प्रवासी कारमध्ये एक जागा शिल्लक असल्याची बतावणी करत एका मजबूत बांध्याच्या व्यक्तीने गिरीश यांचा विश्वास संपादन केला. खारघर इथे जाण्यासाठी अडीचशे रूपयांची बोलीही ठरली आणि प्रवास सुरू झाला. 

पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेंट कारमध्ये चालकासह चौघेजण बसले होते. एक्स्प्र्रेस वेवर तळेगाव इथे पेट्रोल भरण्यासाठी कार थांबली. त्यानंतर लघवीचं निमित्त करून चालकाने कार पुन्हा थांबवली. त्यावेळी चालकाशेजारी बसलेली व्यक्ती गिरीशच्या बाजूला येऊन बसल्यावर त्यांनी थेट गिरीश यांना बंदूक दाखवत मारहाण करत गिरीश यांची सोन्याची चेन, मोबाईल फोन, रोख रक्कम असलेलं पाकीट जबरदस्तीने काढून घेतलं. 

गिरीश यांच्याकडून जबरदस्तीने एटीएमचा पासवर्ड घेत एटीएममधून ४१ हजार रूपये लुटले. लुटारूंनी गिरीश यांना कळंबोलीत रस्त्यावर टाकून पलायन केलं. 

पोलिसांनी अज्ञात चौकडीवर गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँच आणि पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर घडलेली महिन्याभरातली ही पाचवी घटना. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांचं संरक्षण कसं वाऱ्यावर सोडलंय हे दाखवणारं हे उदाहरण. महिन्याभरात पाच पाच लुटमारीच्या घटना घडत असतील तर या मार्गावर सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचं दिसून येतं आहे.