उद्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी  सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Updated: Jun 24, 2018, 08:35 AM IST
उद्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर title=

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील सगळ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी  सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदार संघाची २५ जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही विशेष सुट्टी जाहीर करण्यात आलीय. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबतच पत्रक जारी केलंय. 

७० हजार नोंदणी

या निवडणुकीसाठी जवळपास 70 हजार इतकी मतदार नोंदणी झाली आहे. चौरंगी लढाई होत असली तरी थेट लढत ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप पुरस्कृत पुरोगामी आघाडी तसंच मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा पाठिंबा मिळवलेले राजू बंडगर हे देखील आपलं भवितव्य आजमावत आहेत. चारही उमेदवारांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून यंदा डॉ.दीपक सावंत यांना डावलून विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून अॅडव्होकेट अमित मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

स्वाभिमान पहिल्यांदाच 

धारावी बचाव समितीचे प्रमुख ऍड. राजेंद्र कोरडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या पुरोगामी पदवीधर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत असून मुंबई ग्रॅज्युएट महासंघाचे अध्यक्ष राजू बंडगर यांना पक्षाने पाठिंबा दिलाय. बंडगर हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत. तसेच मनसेचा पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.