राज ठाकरे यांचे चिरंजीव दुर्धर आजारातून बाहेर आणि ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे  दुर्धर आजारातून बाहेर पडले आहेत. आता ते वेगळ्याच कामाला लागले आहेत.  

Updated: Sep 14, 2017, 05:27 PM IST
राज ठाकरे यांचे चिरंजीव दुर्धर आजारातून बाहेर आणि ... title=
अमित राज ठाकरे आणि प्रसिद्ध फुटबॉलपट्टू रोनाल्डीनो

दिनेश दुखंडे / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे  दुर्धर आजारातून बाहेर पडले आहेत. आता ते वेगळ्याच कामाला लागले आहेत. खास फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू रोनाल्डीनो यांची खास उपस्थिती असणार आहे. रोनाल्डीनो मुंबईत दाखल झालाय.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आता एकदम फिट अँड फाईन आहेत. खेळांमध्ये फुटबॉलमध्ये अमित यांना विशेष रुची आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई, आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोग्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केले आहे. स्पर्धेच्या आयोजनात अमित हे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत.

मुंबई महापलिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कौटुंबिक स्तरावर एका मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागलं होते. त्यांचे चिरंजीव अमित यांना एका दुर्धर आजारानं ग्रासलं होते. त्या परिस्थितीही ठाकरेंनी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला, जाहीर सभा घेतल्या. 

एकीकडे पक्षप्रमुख म्हणून निवडणुकीचं कर्तव्य तर दुसरीकडे मुलाच्या तब्येतीच्या काळजीत अडकलेलं पित्याचे मन. या सगळ्या प्रसंगाला राज आणि त्यांचे कुटुंब गेले आठ महिने धीरानं सामोरे गेले. अमित यांनीही मानसिकरित्या कणखर होत उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एका मोठ्या संकटातून ठाकरे कुटुंब आता बाहेर आलंय आणि हळूहळू स्थिरावू लागलंय.

उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत पूर्णपणे तंदुरुस्त झालेल्या अमित यांनी पुन्हा नव्यानं आपली इनींग सुरु केलीय. ते आता पूर्वीप्रमाणेच पक्षाच्या बैठकांना आवर्जून उपस्थित असतात. खेळांमध्ये विशेष रुची असल्यानं त्यांनी आंतराराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोग्या प्रीमियर फौसल लीग  या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केले आहे.

१५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने मुंबई, बंगळुरू आणि दुबईत होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामगे अमित हे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबईत दाखल होत असलेल्या  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या फुटबॉल प्लेयर्सचं अमित स्वतः विमानातळावर उपस्थित राहून स्वागत करीत आहेत. 

तर फुटबॉल प्लेयसरच्या मुंबईतील व्यवस्थेवरही त्यांचं विशेष लक्ष आहे. मुंबईत वरळीतील डोम NSCI या चकाचक स्टेडियमवर या स्पर्धेचे सामने होणार आहेत. स्पर्धेच्या बहुतांश सामन्यांना उपस्थित राहून खेळाचा मनमुराद आनंद लुटण्याचा अमित यांचा प्रयत्न असेल. गेले आठ महिने संयमाची कसोटी पाहणाऱ्या एका खडतर अनुभवातून गेल्यानंतर अमित यांच्यासाठी ही फुटबॉल स्पर्धा नवी उमेद ठरेल!

दिनेश राज, अभिनंदन बालसुब्रमण्यम् आणि निथ्या गणेश हे तिघे या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनातले  खरे चेहरे. ते अमित यांचे मित्रही आहेत. पण त्यांना स्पर्धा आयोजनात येणाऱ्या अडचणी अमित यांनी गांभीर्यान लक्ष घालून चुटकीसरशी सोडवल्या.