भांडुपच्या मोहनिश निकमचा वर्ल्ड रेकॉर्ड

फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये भांडुपच्या मोहनिश निकमनं नवा विक्रम केलाय.. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय..

Updated: Jul 1, 2017, 08:59 PM IST
भांडुपच्या मोहनिश निकमचा वर्ल्ड रेकॉर्ड title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये भांडुपच्या मोहनिश निकमनं नवा विक्रम केलाय.. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय..

रोनाल्डिनो म्हणजे फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातला ताईत... जगभरात त्याचे असंख्य चाहते कम फॉलोअर्स आहेत. त्यालाच गुरू मानून मुंबईतल्या एका एकलव्यानं फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये नव्या जागतिक विक्रमाची नोंद केलीय... या एकलव्याचं नाव आहे मोहनिश निकम... 

भांडुपच्या मोहनिशनं चक्क टुथब्रशवर 46.20 सेकंद एवढा काळ फुटबॉल फिरवला. याआधी 42.72 सेकंद फुटबॉल फिरवण्याचा विक्रम होता. मोहनीशच्या या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतलीय...

मोहनिशला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. परंतु फुटबॉल शिकण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ नसल्यानं त्यानं टीव्ही आणि युट्युबवरच फुटबॉल मॅचेस पाहून शिकायचं ठरवलं. तो स्वतःच घराच्या आजुबाजूला फुटबॉल सराव करायचा. आता फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये पारंगत झालेल्या मोहनीशनं इंडियन सुपरलीगमध्ये वेगळी छाप पाडलीय. त्यामुळं पालकांनाही त्याचा अभिमान आहे.

मोहनिश सध्या आपलं पदवी शिक्षण पूर्ण करतोय. सोबतच त्यानं द आर्ट ऑफ फुटबॉल फ्री स्टाइल नावाची अकादमी सुरू केलीय. उमद्या खेळाडूंना घडवण्याचं काम तो करतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये भारताचं नाव उंचावण्याची त्याची इच्छा आहे.

कुठलंही प्रशिक्षण न घेता मोहनिशनं एकलव्यासारखा फुटबॉलचा सराव करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं... भविष्यात त्याला स्वतःचाच रेकॉर्ड मोडायचाय... त्यासाठी मोहनिशला झी मीडियाकडून खास शुभेच्छा...