मुंबईत काळ्या यादीतील कंत्राटदारांनाच पुन्हा करोडो रूपयांची कामे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी वर्षानुवर्षे कार्यरत आहे. नालेसफाई घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांना महापालिकेनं काळ्या यादीत टाकलंय, त्यांनाच घनकचरा विभागातून करोडो रूपयांची कामं दिली जातायत. हे नेमकं कसं घडतं, पाहूयात 'कचऱ्यातला मलिदा' या आमच्या विशेष सिरीजमधून.

Updated: Sep 12, 2017, 09:13 PM IST
मुंबईत काळ्या यादीतील कंत्राटदारांनाच पुन्हा करोडो रूपयांची कामे

कृष्णात पाटील/ मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी वर्षानुवर्षे कार्यरत आहे. नालेसफाई घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांना महापालिकेनं काळ्या यादीत टाकलंय, त्यांनाच घनकचरा विभागातून करोडो रूपयांची कामं दिली जातायत. हे नेमकं कसं घडतं, पाहूयात 'कचऱ्यातला मलिदा' या आमच्या विशेष सिरीजमधून.

मुंबई महापालिकेतला नालेसफाई घोटाळा २०१५ मध्ये उजेडात आला. या घोटाळ्यात अडकलेल्या ३२ कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी १० डिसेंबर २०१५ ला काढले. या ३२ कंत्राटदारांना यापुढं कुठलंही काम देऊ नये, असं त्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु घनकचरा व्यवस्थापन विभागातील निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी नालेसफाईतल्या घोटाळेबाजांना कोट्यवधींची कंत्राटं बहाल केली.

श्री कविराज इन्फ्रा ही जमनालाल जैन, त्यांचा मुलगा विपूल जैन आणि त्यांच्या तीन सुनांची कंपनी. तर विश्वशक्ती ही जमनालाल जैन यांच्या कमलेश आणि राजकुमार या दोन मुलांची कंपनी. या दोन्ही कंपन्या नालेसफाई घोटाळाप्रकरणी काळ्या यादीत आहेत. परंतु जैन कुटुंबाची आणखी एक कंपनी असलेल्या ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्यासाठी ६ कोटी ८० लाखांचं काम देण्यात आले. जमनालाल जैन यांच्या कुसूम आणि सोनिया जैन या दोन सुनांची नवी कंपनी कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेट कंपनीला कुर्ला कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्यासाठी ८ कोटी ९२ लाखांचं कंत्राट दिलं गेलं. कविराज एमबीबी या नव्या कंपनीला आवश्यक अनुभव नसल्यानं कुसुम आणि सोनिया जैन यांनी आपल्या सासूबाईंच्या केके कॅरिअर या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये घेऊन कुर्ल्याचं कंत्राट मिळवलं.

विशेष म्हणजे या कंत्राटदारांनी आपली कुठलीही चौकशी सुरू नसून आपण काळ्या यादीत नसल्याचं पत्रही बीएमसीला सादर केलंय. म्हणजे घोटाळेबाज तेच, फक्त कंपन्यांची नावं बदलली गेलीत. जैन कुटुंबियांना घनकचरा व्यवस्थापन विभाग एवढं झुकतं माप का देतंय, हे वेगळं सांगायला हवं का?

कंत्राटदार विपूल जैन यांनी मात्र नवी कंपनी स्थापन करून कुठलेही काम मिळवले नसल्याचा खुलासा केलाय. ग्लोबल वेस्टमध्ये जैन कुटुंबियांचे कुणीही नसल्याचे त्यांचे मत आहे. कचरा उचलण्याची कंत्राटं देताना निविदा प्रक्रिया कशी झाली.

कुर्ला, महालक्ष्मी, गोराई आणि वर्सोवा या चार कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा उचलण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांचा अपवाद वगळता इतर सर्वजण काळ्या यादीतील कंत्राटदार होते. तसंच ग्रूप २ मध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये कचरा उचलणारे ग्लोबल आणि ध्रूव इऩ्फ्रा यांनी महालक्ष्मीसाठी मात्र एकमेकांविरोधात टेंडर भरलं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे नालेसफाई घोटाळा करणा-यांना पुन्हा कचरा उचलण्याची कामं दिली. आणि त्यांनीच पुन्हा कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करून नवा घोटाळा केला. याप्रकरणी जैन कुटुंबियांच्या ग्लोबल वेस्ट, कविराज एमबीबी केके आणि श्री कविराज या तीन कंपन्यांवर गुन्हे नोंदवले गेलेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close