मंत्रिमंडळाची भाकरी फिरवणार मुख्यमंत्री... जाणून घ्या कारण...

राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 16, 2017, 05:45 PM IST
 मंत्रिमंडळाची भाकरी फिरवणार मुख्यमंत्री... जाणून घ्या कारण...   title=

 दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय...
 

मंत्र्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळं देवेंद्र फडणवीस सरकार अडचणीत आलंय. येत्या ऑक्टोबरमध्ये फडणवीस सरकारला तीन वर्षं पूर्ण होतायत. मात्र पारदर्शकतेची ग्वाही देणा-या फडणवीसांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना विरोधकांनी सध्या टार्गेट केलंय. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा कथित भ्रष्टाचार विरोधकांनी चव्हाट्यावर आणला. 

याआधीही अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित होतायत. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झालीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं सरकारची बदनाम होत असल्यानं अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. 

पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. त्यानंतर 8 ते 10 दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील. त्याआधी काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपात प्रवेश करतील, अशी चिन्हं आहेत. राणेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून, महत्त्वाचं खातं दिले जाईल, असं भाजपमधील सूत्रांचं म्हणणं आहे.

 येत्या 6 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतोय. त्याआधीच मंत्रिमंडळ फेरबदलाचा मुहुर्त साधला जाण्याची शक्यता आहे.

 मंत्रीमंडळ फेरबदलात वादग्रस्त ठरलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे खाते बदलले जाण्याची किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असला तरी त्यांचं भवितव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवणार आहेत.

मेहता यांच्याव्यतिरिक्त भाजपमधील अकार्यक्षम आणि वादग्रस्त ठरलेल्या काही मंत्र्यांनाही डच्चू मिळेल अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यात काही कॅबिनेट मंत्र्यांचा तर काही राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. ज्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल त्यांच्या जागी नवे मंत्री घेताना प्रादेशिक, जातीय आणि भाषिक समतोल साधला जाण्याची चिन्हं आहेत.