काँग्रेस - राष्ट्रवादीची 'त्या' आठ जागांबाबत पुन्हा बोलणी

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली चर्चा उद्यापासून सुरू होत आहे. 

Updated: Dec 18, 2018, 09:12 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादीची 'त्या' आठ जागांबाबत पुन्हा बोलणी title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली चर्चा उद्यापासून सुरू होत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेग देण्याचे ठरवले आहे. 

दोन्ही काँग्रेसची मुंबईत उद्या संध्याकाळी बैठक होते आहे. दोन्ही पक्षांमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांचे वाटप पूर्ण झाले आहेत. उर्वरित 8 जागांसंदर्भातील चर्चा उद्यापासून सुरू होणार आहे. यातील काही जागांची अदलाबदल तर काही जागा मित्रपक्षांना सोडण्यासंदर्भात दोन्ही पक्षात चर्चा होईल. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड काँग्रेसने जिंकल्यामुळे राज्यातील जागा वाटपामध्ये काँग्रेस आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार की कायम राहणार याची उत्सुकता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुढील आठ जागांसंदर्भात वाद कायम आहे. यात पुणे, अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक जालना, नंदूरबार या लोकसभा जागांबाबत हा वाद आहे.