कासकर, रावच्या अटकेनंतर पोलिसांत श्रेयाची लढाई?

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रँचनं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला बेड्या ठोकल्यात. एका एसआरए कन्सल्टंटकडून खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. यानिमित्तानं पोलीस दलातच स्पर्धा सुरू झालीय.

Updated: Oct 12, 2017, 10:35 PM IST
कासकर, रावच्या अटकेनंतर पोलिसांत श्रेयाची लढाई?

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रँचनं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला बेड्या ठोकल्यात. एका एसआरए कन्सल्टंटकडून खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. यानिमित्तानं पोलीस दलातच स्पर्धा सुरू झालीय.

अंडरवर्ल्डचे दोन डॉन... दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन... दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय... तर छोटा राजनला सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे क्राईम ब्रँचनं दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणी अटक करुन मोक्का लावलाय. आता आपणही कमी नाही हे दाखवण्यासाठी मुंबई पोलिसांनी छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला खंडणी प्रकरणी अटक केलीय. अॅन्टॉप हिल इथल्या एका सोसायटीमध्ये प्रमोटरमार्फत डी के राव एका एसआरए सल्लागाराला धमकावत होता, असा आरोप त्याच्यावर आहे.

डी. के. राववर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, धमकावणे असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनचे भारतातील सर्व व्यवहार तोच सांभाळायचा. मे २०१६ मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता... ज्या प्रकरणात रावला अटक केलीय त्या प्रकरणात छोटा राजननेदेखील तक्रारारदाराला फोनवर धमकावले होतं का? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

खरं तर इक्बाल कासकरला ठाणे क्राईम ब्राँचनं मुंबई पोलिसांच्या नाकाखालून नागपाडा येथून अटक केल्यापासून मुंबई पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता डी. के. रावला अटक करुन दाऊद आणि छोटा राजन प्रमाणंच पोलीस दलातदेखील दोन गट आहेत की काय, अशी चर्चा रंगू लागलीय.

इक्बाल कासकरनंतर डी के राव याला अटक करुन पोलीस दलात दलात अंडरवर्ल्डवरील वर्चस्वावरुन स्पर्धा आहे, हे स्पष्ट झालंय. पण, राजरोसपणे धमक्या देऊन खंडणी मागितली जातेय. शिवाय लोकं अंडरवर्ल्डच्या भीतीने पोलिसांत तक्रार करत नाहीत, हेदेखील आता उघड झालंय. त्यामुळे अंडरवर्ल्डचा खात्मा केल्याच्या दावा करणारे पोलिसच अंडरवर्ल्ड सक्रिय असल्याचं बागुलबुवा निर्माण करतायेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.