दाऊदचं भारतातलं घर होणार जमीनदोस्त

मुंबईच्या भेंडीबाजारातला पाकमोडिया स्ट्रीट म्हटलं की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचं घर हीच गोष्ट पहिली आठवते. दाऊद भारतातून पळाला तरी त्याचं वडिलोपार्जित घर इथे आहे... दाऊदच्या साम्राज्यावर भारतातल्या सुरक्षा यंत्रणा हातोडा घालत असतातच पण आता दाऊदच्या घरावरच घण पडणार आहेत.

Updated: Sep 8, 2017, 08:01 PM IST
दाऊदचं भारतातलं घर होणार जमीनदोस्त title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या भेंडीबाजारातला पाकमोडिया स्ट्रीट म्हटलं की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचं घर हीच गोष्ट पहिली आठवते. दाऊद भारतातून पळाला तरी त्याचं वडिलोपार्जित घर इथे आहे... दाऊदच्या साम्राज्यावर भारतातल्या सुरक्षा यंत्रणा हातोडा घालत असतातच पण आता दाऊदच्या घरावरच घण पडणार आहेत.

मुंबईतल्या भेंडीबाजारतली पाकमोडिया स्ट्रीटवरची ११७ वर्षे जुनी हुसैनी इमारत एकाएकी कोसळली. या अपघातात ३३ जणांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र त्याहीपेक्षा चर्चा सुरू झाली ती दाऊद इब्राहीमच्या घराची... हुसैनी इमारतीला लागून असलेली डांबरवाला इमारत म्हणजे दाऊदचं घर... ती इमारत पडली असती तर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर जिवंत गाडला गेला असता. पण तो वाचला.

जप्तीचे आदेश धूळ खात पडून

ही इमारत तशी अनेक दशकांपासून चर्चेत आहे. १२ मार्च १९९३ साखळी बॉम्बस्फोटानंतर २००२ साली विशेष टाडा न्यायालयाने तस्करी आणि विदेश चलन गैरव्यवहार कायद्यांतर्गत दाऊदचं घर जप्त करण्याची नोटीस दिली होती. तसंच जे जे मार्गावर दाऊदचं शबनम गेस्ट हाऊसही जप्त करण्याचे आदेश दिले होते. पण दाऊदच्या भीतीने या घराला कोणीच हात लावला नाही. 

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दाऊदचे वडील राहायचे... याच ठिकाणी दाऊद लहानाचा मोठा झाला. दाऊदची बहीण हसीना पारकरचं लग्न झाल्यावर तिलाही याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर जागा देण्यात आली. तीन वर्षांपूर्वी तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अजूनही दाऊदचा छोटा भाऊ इक्बाल कासकर राहतो. पण ३१ ऑगस्टच्या इमारत दुर्घटनेनंतर इक्बालला इथे राहण्यास मनाई करण्यात आलीय.

दाऊदची दहशत

धोकादायक झालेली हुसैनी इमारत न पाडण्यात प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहेच. पण त्याचसोबत दाऊदच्या भीतीनेही इथे अधिकारी कारवाई करण्यास येत नाहीत, हेही तेवढंच सत्य आहे. कोणताही बिल्डर इथे इमारत बांधण्यास येत नाही. तसंच कोणीतीही सरकारी घरांची योजना इथे राबवण्याआधी १० वेळा विचार करावा लागतो. परिणाम इथल्या लोकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय. त्यामुळे हुसेनी इमारतीसारखी दुर्घटना परत घडली तर कोण जबाबदार असेल याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल.