मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना

 शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.

Updated: Jun 23, 2018, 08:30 AM IST
मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना title=

मुंबई: 'बडे मासे पळून गेले किंवा पळवले गेले. आता छोट्यांची गर्दन पकडून सरकार स्वतः दारासिंग असल्याचा आव आणत आहे. ही फसवणूक आहे', असे सांगतानाच 'मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली आहे. रुपयास डॉलर्सच्या बरोबरीत आणून मनमोहन सिंग नव्हे, तर आपणच खरे अर्थपंडित आहोत असे श्री. मोदी यांना दाखवायचे होते, पण डॉलर्सच्या तुलनेत रुपया भयंकर घसरला आहे. तरीही डॉलर्सची उधळण करीत पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्या सुरूच आहेत. बँका व आर्थिक संस्था बेशिस्तपणे वागत आहेत व मोदी यांच्या नाकासमोरून बँकांचे दरोडेखोर पळून गेले', असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सोडले आहे.

सरकार स्वतः दारासिंग असल्याचा आव आणत आहे

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात ठाकरे यांनी बांधकाम व्यवसाईक डीएस कुलकर्णी अटक, त्याच प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना झालेली अटक, विदेशात पळालेले मोदी, माल्या आदींवरून सरकारवर कोरडे ओढले आहेत. सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणतात, 'देशात सध्या आर्थिक अराजक आहे. ते वाढतच आहे. मोदी सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही आता राजीनामा देऊन परदेशात पळ काढला आहे. मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी वगैरे आधीच पळाले. रघुराम राजनही मोदी सरकारला वैतागून गेले. आता बँक ऑफ महाराष्ट्रची गर्दन पकडून सरकार स्वतः दारासिंग असल्याचा आव आणत आहे. ही फसवणूक आहे. मोठे मासे पळून गेले (किंवा पळवले!) डी.एस.के. पळून गेले नाहीत व बँक ऑफ महाराष्ट्रवाले जाऊन जाणार कुठे? त्यांना पकडले आहे. शाब्बास! यालाच म्हणतात कठोर कारवाई!!' 

शिवसेनेचा विरोध आणि भाजपची गोची

दरम्यान, ठाकरे यांची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे. त्यामुळे विरोधकांचे काम सोपे होत असले तरी, भाजपची मात्र मोठीच गोची होताना दिसत आहे.