इंग्लिश विंग्लिश फेम सुजाता कुमार यांचे निधन

'रांझना' आणि 'गुजारिश' या चित्रपटांमध्येही केला होता अभिनय

Updated: Aug 20, 2018, 11:31 AM IST
 इंग्लिश विंग्लिश फेम सुजाता कुमार यांचे निधन title=

मुंबई: बॉलीवूडच्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात असलेल्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. सुजाता यांची बहीण अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. रविवारी रात्री ११.२६ वाजता सुजाता आपल्याला सोडून गेली. तिच्या जाण्यामुळे आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी सांगितले. 
 
 सुजाता यांना कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला होता. त्यामुळे सुजाता यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना १८ ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
 इंग्लिश विंग्लिश चित्रपटात त्यांनी साकारलेल्या श्रीदेवी यांच्या बहिणीच्या भूमिकेमुळे सुजाता प्रकाशझोतात आल्या होत्या. सुजाता यांनी 'रांझना' आणि 'गुजारिश' या चित्रपटांमध्येही काम केले होते. याशिवाय, टेलिव्हिजनवरील २४ या मालिकेतील त्यांची भूमिकाही लोकप्रिय ठरली होती.